Home Breaking News नवेगाव रै येथील अवैध दारूविक्री बंद करा; अन्यथा चक्काजाम आंदोलनासह अन्नत्याग उपोषण..!

नवेगाव रै येथील अवैध दारूविक्री बंद करा; अन्यथा चक्काजाम आंदोलनासह अन्नत्याग उपोषण..!

0
20

*नवेगाव रै येथील अवैध दारूविक्री बंद करा; अन्यथा चक्काजाम आंदोलनासह अन्नत्याग उपोषण..!

पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष!

दि. ३१ ऑक्टोबर २०२६ | गडचिरोली

गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही चामोर्शी तालुक्यातील मौजा नवेगाव रै व परिसरातील कथित अवैध दारूविक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावातील सामाजिक शांतता, कौटुंबिक स्वास्थ्य आणि कायदा-सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वी थेट पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्याकडे निवेदन देऊनही समाधानकारक कारवाई झाली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आता अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद न झाल्यास पोलीस मुख्यालयासमोर तसेच मुख्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन आणि अन्नत्याग उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.या

दारूविक्रीमुळे गावातील शांतता धोक्यात?

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नवेगाव रै व परिसरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत आहे. भांडण-तंटे, कौटुंबिक कलह आणि सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अवैध दारूविक्रीला वेळीच आळा घातला नाही, तर भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अशा प्रकारच्या तक्रारी पुढे येत असतील, तर संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

निवेदनानंतरही कारवाई नाही? ग्रामस्थांचा प्रशासनाला सवाल करत

अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वीच पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्याकडे निवेदन सादर केले होते. मात्र, अद्याप समाधानकारक कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

केवळ निवेदने स्वीकारून प्रश्न सुटणार नाही, तर प्रत्यक्ष घटनास्थळी चौकशी करून अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. संबंधित ठिकाणी तपासणी करून अवैध दारूविक्रीचे प्रकार पूर्णपणे थांबवावेत आणि गावातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

आता तीव्र विरोध दर्शवून आरपारची लढाई चक्काजाम आणि अन्नत्याग उपोषणाचा इशारा करण्यात आले आहे

वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. नवेगाव रै परिसरातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत; अन्यथा पोलीस मुख्यालयासमोर तसेच मुख्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन आणि अन्नत्याग उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी उपस्थित ॲड. रामचंद्र गजानन सातपुते (माजी सदस्य, ग्रामपंचायत नवेगाव रै), सुरेश कुकडे, स्वप्निल सुरजागडे, हरिदास गव्हारे, तुळशिदास भांडेकर, राम भुरसे, पंकज शेंडे यांच्यासह समस्त गावकरी उपस्थित होते. आता प्रश्न केवळ अवैध दारूविक्रीचा नाही, तर गावातील सामाजिक शांतता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासन ठोस कारवाई करणार की आंदोलनाची वेळ येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!