
गडचिरोलीत भाजयुमोतर्फे भव्य युवा संवाद व निबंध स्पर्धेचे आयोजन; विजेत्यांना ३३ हजार रुपयांची बक्षिसे!
‘विकसित भारत’ विषयावर तरुणांना विचार मांडण्याची संधी; आमदार डॉ. मिलिंद नरोटे व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांची प्रमुख उपस्थिती
गडचिरोली | प्रतिनिधी :भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने युवकांच्या विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच राष्ट्राच्या विकासात तरुणांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने ‘भव्य युवा संवाद व निबंध स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील आरमोरी रोडवरील सुमनंद सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या स्पर्धेसाठी ‘विकसित भारत’ हा विषय निश्चित करण्यात आला असून, देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांच्या कल्पना, नावीन्यपूर्ण दृष्टिकोन आणि विकासाभिमुख विचारांना चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत तरुणांची भूमिका महत्त्वाची असून, या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेत १६ ते २५ वर्षे वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. निबंध किमान ६०० व कमाल ८०० शब्दांचा असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी स्वतःचे पेन व पेपरपॅड सोबत आणावेत. निबंधासाठी आवश्यक कागद आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव!
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडून १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री अनुसूचित जनजाती मोर्चाचे डॉ. अशोक नेते यांच्याकडून ११ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडून ७ हजार रुपये अशी एकूण ३३ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाला भाजपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम, आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, जिल्हा महामंत्री आकाश सातपुते, अक्षय हेमके, पवन रामगिरकर तसेच शहराध्यक्ष साई सिलमवार यांच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे.
युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे — आयोजकांचे आवाहन
‘विकसित भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी तरुण पिढीच्या विचारांना आणि कल्पनांना योग्य दिशा मिळणे आवश्यक आहे. या स्पर्धेमुळे युवकांमध्ये राष्ट्रविकासाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या निबंध स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या विचारांना व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने करण्यात आले आहे.








