
आदिवासी समाजाच्या परिवर्तनासाठी एकजुटीने पुढे या; राजकीय नेतृत्व नसल्यामुळे आदिवासी समाज दिशाहीन होत असल्याची भीती – माजी आमदार डॉ. देवराव होळी
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत हजारोंच्या उपस्थितीत भव्य सोहळा; शिक्षण, रोजगार आणि राजकीय नेतृत्वावर मांडली परखड भूमिका
गडचिरोली : आदिवासी समाजाचा इतिहास हा संघर्ष, स्वाभिमान आणि अस्मितेचा इतिहास आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरुद्ध लढा देत समाजाला स्वाभिमानाची नवी दिशा दिली. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण परिवर्तनासाठी समाजाने एकजुटीने पुढे येणे आणि नव्या नेतृत्वाने विकासाची जबाबदारी स्वीकारणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.
गडचिरोली येथील भगवान बिरसा मुंडा चौकात आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.* त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या क्रांतिकारी कार्याला उजाळा देण्यात आला.
*समाजासमोरील प्रश्नांवर आता केवळ चर्चा नको, तर ठोस कृती हवी!
मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी समाजासमोरील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. आज समाजामध्ये सक्षम राजकीय नेतृत्वाची उणीव, युवकांमधील वाढती बेरोजगारी, शिक्षण आणि रोजगाराच्या मर्यादित संधी यांसारखे प्रश्न गंभीर आहेत. या प्रश्नांवर मात करण्यासाठी समाजाने संघटित होऊन स्वतःच्या विकासाची दिशा निश्चित केली पाहिजे. समाजातील सुशिक्षित युवक, अभ्यासू कार्यकर्ते आणि नव्या नेतृत्वाने पुढाकार घेऊन विकासाचा व्यापक आराखडा तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
*आदिवासी समाजाच्या विकासासाठी सतीश पेंदाम यांनी पुढाकार घ्यावा!
आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रगतीसाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक असल्याचे सांगत माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी इंजि. सतीश पेंदाम यांना समाजाच्या विकासाचा ठोस प्लॅन तयार करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. समाजातील सर्व विचारांचे लोक, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन समाजहिताला प्राधान्य द्यावे. राजकीय मतभेद असले तरी सामाजिक विकासाच्या मुद्द्यांवर सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
*‘व्हिजन २०४७’ मधून विकसित गडचिरोलीची दिशा!*
गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आकांक्षित गडचिरोली ते विकसित गडचिरोली – व्हिजन २०४७’ या संकल्पनेच्या माध्यमातून नियोजनबद्ध प्रयत्न सुरू असल्याचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सांगितले. जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी, शिक्षण व आरोग्य सुविधांचा विस्तार, स्थानिक उद्योगांना चालना, आदिवासी संस्कृतीचे संवर्धन आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा विकासाभिमुख उपयोग या बाबींवर भर देण्याची आवश्यकता आहे. गडचिरोली जिल्ह्याची ओळख केवळ आकांक्षित जिल्हा म्हणून न राहता तो विकसित, समृद्ध आणि रोजगारनिर्मिती करणारा जिल्हा व्हावा, यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे त्यांनी आवाहन केले.
*विचार वेगवेगळे असले तरी समाजाच्या विकासासाठी एकत्र येणे हाच बिरसा मुंडा यांना खरा अभिवादनाचा मार्ग आहे*, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक इंजि. सतीश पेंदाम, प्रा. दिलीप चौधरी, प्रमुख अतिथी कवयित्री कुसुम आलाम, माधुरी मडावी, शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख पवन गेडाम, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, नगरसेविका प्रतिभा कुमरे, जिल्हा महाग्रामसभेचे अध्यक्ष नितीन पदा, गांधीवादी विचारवंत प्रकाश अर्जुनवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड, प्रा. अनिल होळी, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. हितेश मडावी, नगरसेवक बालू टेम्भूर्णे, शिवाजी नरोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अन्नपूर्णा सिडाम व प्रदीप कुळसंगे यांनी केले. या सोहळ्याला गडचिरोली जिल्ह्यातील हजारो नागरिक, युवक, महिला आणि आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








