
आजचा युवा हाच उद्याच्या विकसित भारताचा शिल्पकार – भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन!
विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – आमदार डॉ. मिलिंद नरोटे
गडचिरोलीत भाजयुमोतर्फे भव्य युवा संवाद व निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
गडचिरोली | प्रतिनिधी, दि.२१ नोव्हेंबर २०२६ :
गडचिरोली: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने सुमनंद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे ‘युवा संवाद व विकसित भारत निबंध स्पर्धे’चे भव्य आयोजन करण्यात आले. युवकांमध्ये राष्ट्रनिर्मितीची भावना जागृत करणे, त्यांच्या विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि विकसित भारताच्या संकल्पनेत तरुणांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमाला विद्यार्थी, युवा कार्यकर्ते व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आजचा युवा हाच उद्याच्या विकसित भारताचा खरा शिल्पकार आहे. देशाचे भविष्य घडविण्याची ताकद तरुण पिढीमध्ये असून, युवकांनी केवळ नोकरीच्या संधी शोधण्यापुरते मर्यादित न राहता नेतृत्व, कौशल्य, संशोधन, उद्योजकता आणि समाजसेवेच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असा प्रेरणादायी संदेश भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला.
युवकांनी शिक्षणासोबतच राष्ट्रहित, सामाजिक जबाबदारी, शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी आत्मसात करणे आवश्यक आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता असून, त्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करू शकतात. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुणांनी ज्ञान, विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी, या मुद्द्यांवर प्रा. बारसागडे यांनी विशेष भर दिला.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांचे योगदान अधोरेखित केले. भारताला प्रगत, आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली राष्ट्र बनविण्यासाठी शिक्षण, कौशल्यविकास, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांना विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण व शहरी भागातील युवकांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असा संदेश त्यांनी दिला.
या स्पर्धेसाठी ‘विकसित भारत’ हा विषय निश्चित करण्यात आला होता. १६ ते २१ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धेत ६०० ते ८०० शब्दांमध्ये निबंध लेखन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे, राष्ट्राच्या भविष्याविषयी त्यांची मते जाणून घेणे आणि लेखनकौशल्याला प्रोत्साहन देणे हा स्पर्धेमागील उद्देश होता.
स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक १५ हजार रुपये आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडून, द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्याकडून, तर तृतीय पारितोषिक ७ हजार रुपये भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडून देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या मंचावर आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे महामंत्री बादल राऊत, भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे सचिव अमेय विश्वरूप, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, भाजयुमो जिल्हा महामंत्री आकाश सातपुते, भाजयुमो शहराध्यक्ष साई सिल्लमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. युवा संवाद आणि निबंध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची संधी मिळाली. युवकांच्या बौद्धिक क्षमतेला वाव देणारा आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरला.








