
ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासह तळोधी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आ. डॉ. मिलिंद नरोटे
तळोदि येथे ग्रामिण अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उत्साहात उदघाटन
गडचिरोली: ग्रामीण भागातील युवकांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील कौशल्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वीर मराठा क्रिकेट क्लब, रामपुरी टोली यांच्या वतीने आयोजित ग्रामीण अंडरआर्म रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
यावेळी आमदार डॉ. नरोटे यांनी खेळाडूंशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढविला व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. खेळामुळे युवकांमध्ये शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
तळोधीच्या विकासकामांना गती देणार!
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तळोधी परिसरातील प्रस्तावित व मंजूर विकासकामांची माहिती दिली. तळोधी येथे कुंभार समाज सभागृह आणि मच्छी मार्केट उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्मशानभूमीचे काम जनसुविधा योजनेत समाविष्ट करण्यात आले असून, येत्या दोन ते तीन दिवसांत त्यास मंजुरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
याशिवाय कृषी गोदामाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युवकांसाठी सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध करून देण्यासह परिसरातील विविध मूलभूत सुविधा आणि विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच गावांचा सर्वांगीण विकास साधण्याला आपले प्राधान्य असल्याचे आमदार डॉ. नरोटे यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, बूथ प्रमुख किशोर गटकोजवार, मोहन चिलंगे, जितेंद्र कुनघाडकर, निरज पेड्डीवार, अतुल सुर्जागडे, किशोर किरमे, अंकुश संतोषवार, प्रकाश वासेकर, श्रीधर मांदाळे, गणेश दुधबळे, हरिश माकडे, प्रशांत कोटगले, सतीश पेंदोरकर, अभिलाष कुनघाडकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रिकेटप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.








