
सोनापूर येथील 789.70 चौरस मीटर ओपन स्पेस सौंदर्यकरण करा; प्लॉटधारकांचे नगर परिषदेला निवेदन
पाणीपुरवठा विभागाचे सभापती लीलाधर भरडकर यांना निवेदन; साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
गडचिरोली, दि. २ नोव्हेंबर : गडचिरोली शहरातील सोनापूर (कॉम्प्लेक्स) परिसरातील प्रभाग क्रमांक १४ मधील सर्व्हे क्रमांक 115/1/अ अंतर्गत असलेल्या 789.70 चौरस मीटर खुल्या जागेचा सौंदर्यकरण करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी नगर परिषद गडचिरोलीचे पाणीपुरवठा विभागाचे सभापती लीलाधर भरडकर यांना निवेदन सादर केले.
सदर जागा मंजूर लेआउटमध्ये खुली जागा म्हणून दर्शविण्यात आली असून, गेल्या अनेक वर्षांपासून या जागेचा विकास झालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी व सांडपाणी साचत असल्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होत आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, सदर 789.70 चौरस मीटर खुली जागा नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने तिच्या विकासासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशान्वये मंजूर लेआउटमध्ये दर्शविण्यात आलेल्या या खुल्या जागेचा विकास आराखडा तयार करून सन 2026-27 च्या नियोजनात विकासकामांना मंजुरी द्यावी. तसेच नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व सुशोभित खुली जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्लॉटधारकांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सभापती लीलाधर भरडकर यांच्या निदर्शनास
दरम्यान, निवेदन स्वीकारताना पाणीपुरवठा विभागाचे सभापती लीलाधर भरडकर यांच्यासमोर प्लॉटधारकांनी परिसरातील समस्यांचा पाढाच वाचला. खुल्या जागेत साचणारे पाणी, वाढती अस्वच्छता, डासांचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होणारा संभाव्य धोका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
सदर समस्या केवळ खुल्या जागेच्या विकासापुरती मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याने नगर परिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. सभापती लीलाधर भरडकर यांनी संबंधित विभागांशी समन्वय साधून या समस्येच्या निराकरणासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
सोनापूर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा आणि सार्वजनिक सुविधांचा प्रश्न लक्षात घेता नगर परिषद प्रशासनाने खुल्या जागेच्या विकासासाठी तातडीने निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात करावी , अशी मागणी प्लॉटधारकांनी केली आहे.
यावेळी राजेंद्र एस. तितीरमारे, वंगा वेलादि. अजय तांबेकर, पुरुषोत्तम तूलावी,अशोक लांजेवार, आनंद भोयर, गोकुलदास फटींग, विजय गराडे,खुशाल गेडाम, विलास वाढणकर, दिलीप मुनघाटे, हेमंत चुधरी,खेमाजी भोयर,विलास खेवले,अमोल भुरसे,यशवंत कोकोडे, किशोर हडप,नामदेवराव पिंपळकर ,सयाम, मडावी, जीवन अलामे इत्यादी नागरिक उपस्थित होते








