Home गडचिरोली माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ : लोकशाहीचा प्राणवायू, पारदर्शकतेचा दीपस्तंभ आणि जनतेच्या हातातील...

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ : लोकशाहीचा प्राणवायू, पारदर्शकतेचा दीपस्तंभ आणि जनतेच्या हातातील परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र

0
6

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ : लोकशाहीचा प्राणवायू, पारदर्शकतेचा दीपस्तंभ आणि जनतेच्या हातातील परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र

भारतीय लोकशाहीची खरी ताकद संसद, मंत्रालये किंवा शासकीय कार्यालयांमध्ये नसून ती देशातील सामान्य नागरिकांच्या जागरूकतेत आणि सहभागात दडलेली आहे. लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसते, तर शासनाच्या प्रत्येक निर्णयावर, प्रत्येक योजनेवर, प्रत्येक खर्चावर आणि प्रत्येक कृतीवर नागरिकांचे नियंत्रण व देखरेख असणे हेच तिचे खरे स्वरूप आहे. शासन हे जनतेच्या कराच्या पैशातून चालते, त्यामुळे शासनाने काय केले, कोणता निर्णय घेतला, किती निधी खर्च केला आणि त्या निधीचा प्रत्यक्ष लाभ जनतेपर्यंत पोहोचला की नाही, हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. याच लोकशाही मूल्यांना कायदेशीर बळ देणारा, नागरिकांना सशक्त करणारा आणि प्रशासनाला उत्तरदायी बनविणारा ऐतिहासिक कायदा म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ होय.

माहितीचा अधिकार हा केवळ एक कायदा नसून तो लोकशाहीचा प्राणवायू आहे. अनेक दशकांपासून शासकीय कार्यालयांच्या फाईलींमध्ये बंदिस्त असलेली माहिती सामान्य नागरिकांसाठी खुली करण्याचे क्रांतिकारी कार्य या कायद्याने केले आहे. पूर्वी एखाद्या नागरिकाला एखाद्या योजनेचा तपशील, विकासकामाचा खर्च, निधीचा वापर किंवा शासकीय निर्णयामागील कारणे जाणून घेण्यासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत होते. अनेकदा माहिती नाकारली जात होती किंवा नागरिकांना टाळाटाळ केली जात होती. परंतु माहितीचा अधिकार अधिनियम लागू झाल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. आज देशातील प्रत्येक नागरिकाला कायदेशीर अधिकाराने कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे माहिती मागता येते आणि ती माहिती निश्चित कालमर्यादेत देणे संबंधित प्रशासनावर बंधनकारक आहे.

भारतीय राज्यघटनेने नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. मात्र योग्य आणि सत्य माहितीशिवाय कोणतेही मत तयार करणे, शासनाच्या धोरणांवर टीका करणे किंवा प्रशासनाला जबाबदार धरणे शक्य नाही. त्यामुळे माहितीचा अधिकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी, लोकशाहीशी आणि सुशासनाशी थेट जोडलेला आहे. माहिती म्हणजे शक्ती, आणि ही शक्ती सामान्य नागरिकांच्या हातात देण्याचे महान कार्य माहितीच्या अधिकाराने केले आहे. आज एखादा शेतकरी आपल्या गावातील सिंचन प्रकल्पासाठी किती निधी मंजूर झाला आणि त्याचा वापर कसा झाला याची माहिती मागू शकतो. एखादा विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरणाचा तपशील जाणून घेऊ शकतो. एखादा ग्रामस्थ रस्ते, जलकुंभ, पाणीपुरवठा योजना, शौचालये, अंगणवाडी, शाळा किंवा इतर विकासकामांवर खर्च झालेल्या निधीची माहिती मिळवू शकतो. ही माहिती केवळ कागदपत्रे नसून नागरिकांना सक्षम करणारे आणि प्रशासनाला जबाबदार धरणारे प्रभावी साधन आहे.

माहितीचा अधिकार हा शासन आणि जनता यांच्यातील विश्वासाचा भक्कम पूल आहे. ज्या ठिकाणी माहिती लपवली जाते, तेथे संशय, अन्याय आणि भ्रष्टाचार वाढतो; परंतु जिथे माहिती खुली असते, तेथे विश्वास, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण होते. म्हणूनच माहितीचा अधिकार हा चांगल्या प्रशासनाचा पाया मानला जातो. या कायद्यामुळे प्रशासनातील गुप्ततेची भिंत कोसळली आणि नागरिकांना शासनाच्या कामकाजात डोकावण्याचा अधिकार प्राप्त झाला. भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात माहितीचा अधिकार हे सर्वात प्रभावी कायदेशीर अस्त्र ठरले आहे. देशभरातील अनेक घोटाळे, निधी गैरव्यवहार, बनावट बिले, कागदोपत्री विकासकामे, निकृष्ट दर्जाची बांधकामे आणि विविध शासकीय अनियमितता या कायद्यामुळे उघडकीस आल्या आहेत. माहिती सार्वजनिक झाल्यानंतर गैरव्यवहार लपविणे कठीण होते. त्यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचारी अधिक जबाबदारीने काम करू लागले आहेत. माहितीचा अधिकार म्हणजे भ्रष्टाचाराच्या अंधारात प्रकाश टाकणारा एक शक्तिशाली दीपस्तंभ आहे. शासनाकडून खर्च होणारा प्रत्येक रुपया हा जनतेच्या करातून जमा झालेला असतो. त्यामुळे त्या निधीचा उपयोग कुठे, कसा आणि कोणासाठी झाला याची माहिती मिळविण्याचा पूर्ण अधिकार नागरिकांना आहे. माहितीचा अधिकार नागरिकांना सार्वजनिक निधीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची संधी देतो. यामुळे विकासकामांची गुणवत्ता तपासणे, खर्चाची पडताळणी करणे आणि निधीच्या अपव्ययावर प्रश्न उपस्थित करणे शक्य होते. परिणामी सार्वजनिक संसाधनांचा अधिक जबाबदारीने वापर होण्यास मदत होते.

या कायद्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. अनेक वेळा शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. परंतु माहितीचा अधिकार वापरून लाभार्थी यादी, मंजुरी आदेश, निधी वाटप, अर्जांची स्थिती आणि इतर माहिती मिळवून नागरिक आपले हक्क प्रभावीपणे मिळवू शकतात. त्यामुळे हा कायदा केवळ माहिती मिळविण्याचे साधन नसून सामाजिक न्याय मिळवून देणारे प्रभावी माध्यम आहे. माहितीचा अधिकार अधिनियमामध्ये नागरिकांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकाला कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मागण्याचा कायदेशीर अधिकार देण्यात आला आहे. सामान्य प्रकरणांमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवन आणि स्वातंत्र्याशी संबंधित बाब असल्यास माहिती ४८ तासांच्या आत देणे आवश्यक आहे. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणामध्ये जन माहिती अधिकारी (PIO) नियुक्त करणे बंधनकारक असून माहिती पुरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. जर माहिती देण्यास विलंब झाला, चुकीची माहिती देण्यात आली किंवा माहिती अनुचितपणे नाकारण्यात आली, तर संबंधित अधिकाऱ्यावर प्रतिदिन २५० रुपये या दराने कमाल २५,००० रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच नागरिकांना प्रथम अपील आणि द्वितीय अपील करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे. या तरतुदीमुळे कायदा अधिक प्रभावी आणि नागरिकाभिमुख ठरतो.

माहितीचा अधिकार हा केवळ कागदपत्रे किंवा माहिती मिळविण्याचा मार्ग नाही, तर तो समाज परिवर्तनाची चळवळ आहे. या कायद्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लागली आहेत, अनेक गरीब आणि वंचित नागरिकांना त्यांचे हक्क मिळाले आहेत, विकासकामांमध्ये सुधारणा झाली आहे आणि प्रशासनात उत्तरदायित्व वाढले आहे. एका साध्या माहिती अर्जाने अनेक ठिकाणी मोठे बदल घडवून आणले आहेत. त्यामुळे माहितीचा अधिकार हा सामान्य नागरिकाच्या हातातील परिवर्तनाचा प्रभावी शस्त्र बनला आहे.

आजच्या काळात लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, सार्वजनिक निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी आणि नागरिकांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी माहितीचा अधिकार अत्यंत आवश्यक आहे. ज्या समाजात माहिती खुली असते, त्या समाजात न्याय, विकास, विश्वास आणि लोकशाही अधिक बळकट होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने माहितीचा अधिकार समजून घेतला पाहिजे, त्याचा जबाबदारीने आणि प्रभावीपणे वापर केला पाहिजे आणि शासनाला अधिक पारदर्शक व उत्तरदायी बनविण्यासाठी आपली भूमिका बजावली पाहिजे.”माहितीचा अधिकार हा सामान्य माणसाच्या न्याय, पारदर्शकता आणि सुशासनाच्या लढ्यातील सर्वात प्रभावी कायदेशीर अस्त्र आहे.”

म्हणूनच आज प्रत्येक जागरूक नागरिकाने एकच संकल्प केला पाहिजे

“माहिती मागा, हक्क जाणून घ्या, भ्रष्टाचाराला प्रश्न विचारा, प्रशासनाला जबाबदार ठेवा आणि लोकशाही अधिक मजबूत करा.” माहितीचा अधिकार वापरा पारदर्शक, जबाबदार, भ्रष्टाचारमुक्त आणि सशक्त भारत घडवा!

लेखन:- श्री. मनोज एस. उराडे

जिल्हाध्यक्ष- गडचिरोली

माहिती अधिकार, पत्रकार संरक्षण व पोलिस मित्र समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!