
गडचिरोली भाजपची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न; जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमांचे नियोजन
मा. प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार जनसंपर्क, जनजागृती व जनकल्याण उपक्रमांची जिल्हाभर आखणी
गडचिरोली:भारतीय जनता पक्ष, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने जिल्हास्तरीय आढावा व नियोजन बैठकीचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सदर बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत आगामी कार्यक्रमांचे नियोजन, जनसंपर्क अभियानाची दिशा, संघटनात्मक मजबुती तसेच शासनाच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्याचे मा. प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार आयोजित या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध योजना, जनहिताचे निर्णय तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विकास व जनकल्याणकारी उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीत जिल्हाभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे सविस्तर नियोजन करण्यात आले. त्यामध्ये विविध सामाजिक, धार्मिक व जनसहभागातून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन, जनजागृती अभियान तसेच नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात आला.
याशिवाय मीडिया संवाद अभियान, विविध क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी विशेष जनसंपर्क अभियान, नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी जनकल्याण शिबिरे तसेच तालुका स्तरावर माहिती अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच “प्रगती पथ” उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन नागरिकांशी संवाद साधण्यात येणार असून स्वच्छता अभियान, वृक्षारोपण उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक शेती कार्यशाळांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले.
बैठकीत आगामी दिनविशेष कार्यक्रमांच्या आयोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मंडळ बैठक, जिल्हा बैठक आणि शक्ती केंद्र बैठकींचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याने गावागावात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधावा, शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवावी आणि संघटन अधिक सक्षम करण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे आवाहन केले.
या बैठकीस आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री (अनुसूचित जमाती) डॉ. अशोक नेते, माजी आमदार तथा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी, नगराध्यक्षा प्रगती सागर निंबोरकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री सदानंद कूथे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, आघाडी प्रमुख, मंडळ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, कार्यकर्ते व विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थितांनी आगामी उपक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध व समन्वयात्मक पद्धतीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.








