
उच्चशिक्षित अंगणवाडी सेविका प्रिया खरात यांना राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार’ प्रदान
ग्रामीण शिक्षणाला नवे बळ; तांदुळवाडी व सिंदखेडराजा तालुक्याचा राज्यस्तरावर झेंडा उंचावला
ग्रामीण भागातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या तांदुळवाडी (रुम्हणा) येथील उच्चशिक्षित अंगणवाडी सेविका प्रिया तेजकोर प्रकाश खरात यांच्या कार्याचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला असून, त्यांना सन २०२६ चा प्रतिष्ठेचा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात हा सन्मान बहाल करण्यात आला.
हा पुरस्कार आश्रयआशा फाउंडेशन, मालेगाव यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात देण्यात आला. संस्थापक सचिव आशाताई (अलका) बच्छाव यांनी प्रिया खरात यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय, अष्टपैलू योगदानाची तसेच अंगणवाडीतील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत त्यांची निवड केली. तसेच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा पार पडला.
दि. २५ एप्रिल रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात मा. प्रतापराव दिघावकर (माजी विशेष पोलीस महानिरीक्षक व लोकसेवा आयोग सदस्य), डॉ. अमोल शेजवळ (लासलगाव), प्रा. सी. डी. रोटे (निफाड), संजय देशमुख (संस्थापक अध्यक्ष, साईधनवर्षा फाउंडेशन, नाशिक) तसेच जगन्नाथ पंडित बच्छाव गुरूजी (नि.) (कौळाणे) आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
*उच्चशिक्षणातून समाजसेवेचा मार्ग*
M.Sc. (Maths), B.Ed., D.Ed. अशी भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमी असतानाही, आकर्षक करिअरच्या संधी नाकारून प्रिया खरात यांनी ग्रामीण भागातील बालकांना घडविण्याचा ध्यास घेतला. तांदुळवाडी येथील अंगणवाडीतून त्या केवळ शिक्षण देत नाहीत, तर मुलांमध्ये संस्कार, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्यासाठीची दिशा घडवत आहेत.
*‘कुशल अंगणवाडी’ उपक्रमात ठसा*
जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘कुशल अंगणवाडी’ उपक्रमात जिल्ह्यातील सुमारे २६,००० बालकांची चाचणी घेण्यात आली. यामधून निवड झालेल्या २६ गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या केंद्रातील अक्षरा अनिता राजू खरात हिने स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. विशेष म्हणजे, सिंदखेडराजा तालुक्यातून निवड झालेली ती एकमेव विद्यार्थिनी ठरली—ही बाब प्रिया खरात यांच्या कार्यक्षमतेची साक्ष देणारी आहे.
*प्रेरणादायी कार्याचा सन्मान*
प्रिया खरात यांच्या या यशामुळे शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांच्या भूमिकेला नवी ओळख मिळाली असून, अनेक तरुणीनसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत.
*तांदुळवाडीच्या मातीतील एक समर्पित शिक्षिका*…
आज राज्यस्तरावर उजळलेले नाव!
त्यांच्या या कर्तृत्वामुळे केवळ तांदुळवाडीच नव्हे, तर संपूर्ण सिंदखेडराजा तालुका अभिमानाने नतमस्तक झाला आहे.








