
ठाकूरनगर व नरेंद्रपूर गावांचा वनविभाग व वनविकास महामंडळाने संयुक्त विकास करावा – डॉ. प्रणय खुणे
वाघप्रभावित गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल नाराजी; वीज, वनविभाग व मूलभूत सुविधांच्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी
चामोर्शी (घोट) | प्रतिनिधी, दि. २३ नोव्हेंबर २०२६ : चामोर्शी तालुक्यातील नरेंद्रपूर व ठाकूरनगर या वाघप्रभावित गावांच्या सर्वांगीण विकासासाठी वनविभाग व महाराष्ट्र वनविकास महामंडळाने संयुक्तपणे पुढाकार घ्यावा. तसेच गावकऱ्यांच्या विद्युत व वनविषयक समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असो.), नवी दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केली.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटन, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी नरेंद्रपूर येथील राधा गोविंद मंदिरात स्थानिक नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वनविभागाचे राऊंड ऑफिसर राठोड, विद्युत विभागाचे आष्टी सर्कल अभियंता राऊत तसेच वनविकास महामंडळाचे येलेकर व आगाशे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान नरेंद्रपूर व ठाकूरनगर येथील नागरिकांनी वनविभाग, वनविकास महामंडळ आणि विद्युत विभागाशी संबंधित अनेक समस्या मांडल्या. दोन्ही गावे वाघप्रभावित क्षेत्रात असूनही वनविभाग व वनविकास महामंडळाकडून आजपर्यंत अपेक्षित विकासकामे करण्यात आली नाहीत. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभही गावकऱ्यांना मिळालेला नाही, अशी नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.
वाघप्रभावित गावांच्या विकासासाठी ठोस उपाययोजना आवश्यक!
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रणय खुणे म्हणाले की, वनक्षेत्रालगत वास्तव्यात असलेल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे संबंधित विभागांनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष विकासकामांना प्राधान्य द्यावे. नरेंद्रपूर व ठाकूरनगर या दोन्ही गावांचा वनविभाग आणि वनविकास महामंडळाने संयुक्त विकास आराखडा तयार करून मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच विद्युत विभागाने गावकऱ्यांच्या वीजविषयक तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वनविभागाचे अधिकारी राठोड यांनी संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन करण्याबाबत तसेच वनव्यवस्थापन आणि विविध विकासात्मक योजनांविषयी नागरिकांना मार्गदर्शन केले. बैठकीत उपस्थित नागरिकांच्या समस्या ऐकून संबंधित अधिकाऱ्यांनी त्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ उपाध्ये, महेश विश्वास, भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर, दिनेश मुजुमदार, तपन माझी, स्थानिक ज्येष्ठ नेते विकास मैत्र, महिला आघाडी नेत्या रेबा सरदार, आनंदग्राम येथील विमल रॉय, वसंतपूर येथील राम विश्वास, शुभम दास यांच्यासह नरेंद्रपूर व ठाकूरनगर येथील शेकडो नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक समस्यांकडे संबंधित विभागांचे लक्ष वेधले गेले असून, वनविभाग व वनविकास महामंडळ आता प्रत्यक्ष विकासकामांसाठी कोणती पावले उचलतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.








