
डॉ. देवराव होळी यांची भाजपा आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती; रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबईत भव्य सत्कार
मुंबई : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची नुकतीच भाजपा आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे त्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
या प्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डॉ. होळी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. होळी हे पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले असून त्यांनी संघटनात्मक पातळीवर सातत्याने आणि प्रभावीपणे काम केले आहे. विशेषतः आदिवासी समाजातील त्यांची मजबूत पकड, तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद आणि गडचिरोली परिसरातील विकासकामांमधील त्यांचा सक्रिय सहभाग लक्षात घेऊनच पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. देवराव होळी यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्य करेन,” असा ठाम संकल्प त्यांनी व्यक्त केला.
डॉ. होळी यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील आदिवासी आघाडीला नवे बळ मिळणार असून संघटनात्मक पातळीवर अधिक जोमाने काम होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.








