
जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोलीत दिनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानासाठी नियोजन बैठक उत्साहात संपन्न
गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी राबविण्यात येत असलेल्या “दिनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान” अंतर्गत जिल्हास्तरीय नियोजन बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. ही बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार कर्तव्य कक्ष क्र. 1 येथे संपन्न झाली.
या बैठकीत ७ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुके व मंडळ स्तरावर व्यापक निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रशिक्षण महाअभियानामध्ये जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, मंडळ अध्यक्ष, बूथ प्रमुख, विविध मोर्चांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते यांना संघटन कौशल्य, विचारधारा, कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
बैठकीदरम्यान आरमोरी व गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील तालुक्यांच्या प्रशिक्षण बैठकींच्या तारखा, वेळ व स्थळ निश्चित करण्यात आले. प्रत्येक तालुक्यात शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने प्रशिक्षण पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला कोरची, कुरखेडा, वडसा, गडचिरोली शहर, गडचिरोली ग्रामीण, धानोरा, चामोर्शी तसेच घोट-आष्टी मंडळांचे अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी व मीडिया सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमताने प्रशिक्षण महाअभियान यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “प्रशिक्षण हे संघटनेचे प्राण आहे. सक्षम, सजग आणि विचारसंपन्न कार्यकर्ता घडविणे हीच या महाअभियानाची मुख्य उद्दिष्टे आहेत. आगामी काळात संघटना अधिक सक्षम करण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरेल.”
या बैठकीमुळे गडचिरोली जिल्ह्यात संघटनात्मक बळकटीस नवे बळ मिळणार असून, दिनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








