
लोकहितवादी पत्रकारितेचा प्रवास; जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना ” अखंड न्यायदर्पण” अंक भेट
गडचिरोली :मुख्य संपादक सचिनजी मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित होणाऱ्या अखंड न्यायदर्पण या सामाजिक, वैचारिक व लोकहितवादी मासिकाचा ताजा अंक गडचिरोली जिल्हा माहिती अधिकारी मा. गजानन जाधव यांना सन्मानपूर्वक भेट देण्यात आला.
या प्रसंगी अखंड न्यायदर्पणचे संपादक प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम व उपसंपादक तिलोतम्मा समर हाजरा उपस्थित होते. या भेटीदरम्यान अखंड न्यायदर्पण मासिकाच्या आतापर्यंतच्या सामाजिक वाटचालीबाबत सविस्तर चर्चा झाली.
जिल्ह्यातील सामाजिक प्रश्न, प्रशासनातील कार्यपद्धती, ग्रामीण व आदिवासी भागातील समस्या तसेच जनहिताच्या विषयांवर अखंड न्यायदर्पण मासिकाने केलेल्या परखड, अभ्यासपूर्ण आणि वस्तुनिष्ठ लेखनाची मा. जाधव यांनी विशेष प्रशंसा केली. पत्रकारिता ही केवळ बातम्यांचे माध्यम नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. अशा दर्जेदार व जबाबदार पत्रकारितेमुळे नागरिकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि योग्य माहिती पोहोचते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच अखंड न्यायदर्पण मासिकाने भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत लोकशाही मूल्ये, पारदर्शक प्रशासन, नागरिकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या यांसारख्या विषयांवर सातत्याने लेखन करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
या भेटीमुळे माध्यमे आणि प्रशासन यांच्यातील सकारात्मक संवाद अधिक दृढ होण्यास मदत होईल, तसेच समाजहितासाठी दोघांचीही भूमिका अधिक प्रभावी ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.








