
‘पाणी आहे तर भविष्य’; नगराध्यक्षा अँड प्रणोती सागर निंबोरकर यांच्या उपस्थितीत ‘वॉक फॉर वॉटर’
दि. २२ ऑगस्ट २०२६ :
गडचिरोली: माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात आला. जलसंधारणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याला अभिवादन करण्यासोबतच मृद व जलसंवर्धनाचे महत्त्व जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जलसंधारण दिनानिमित्त गडचिरोली शहरात ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. इंदिरा गांधी चौक ते जिल्हा स्टेडियम या मार्गावर झालेल्या वॉकेथॉनमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत जलसंधारणाचा संदेश दिला.
राज्यभर १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह राबविण्यात आला. या कालावधीत माती व पाण्याचे संवर्धन, पावसाचे पाणी अडविणे, पाण्याची बचत करणे तसेच जलस्रोतांचे संरक्षण याबाबत जनजागृती करण्यात आली.
वॉकेथॉनच्या माध्यमातून ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. माती आणि पाणी हे जीवनाचे मूलभूत आधार असून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडवणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि मातीचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
“पाणी आहे तरच भविष्य आहे; प्रत्येक थेंब वाचवूया आणि गडचिरोलीला जलसमृद्ध बनवूया,” असा निर्धार वॉकेथॉनच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.








