
गडचिरोली जिल्ह्यातील आठ तालुक्यांत भव्य रोजगार मेळावे; सुशिक्षित बेरोजगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे — प्रा. रमेश बारसागडे
सेवा संकल्प अभियानांतर्गत रोजगार मेळाव्यांचे आयोजन; मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून रोजगाराची संधी; सकाळी १० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन
गडचिरोली, दि. २२ सप्टेंबर २०२६ : सेवा संकल्प अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी केले आहे.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून सेवा, जनकल्याण आणि युवकांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध भागांतील युवकांना जवळच्या ठिकाणी रोजगाराच्या संधींची माहिती मिळावी तसेच रोजगारासाठी आवश्यक मार्गदर्शन व संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आठ ठिकाणी मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.
रोजगार मेळाव्यांची ठिकाणे
1. वडसा — शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
2. आलापल्ली — शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
3. चामोर्शी — शिवाजी ज्युनिअर कॉलेज
4. कोरची — शहीद बिरसा मुंडा महाविद्यालय
5. गडचिरोली — शिवाजी महाविद्यालय
6. आरमोरी — महात्मा गांधी महाविद्यालय
7. धानोरा — श्री. जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे आर्ट्स अँड कॉमर्स अँड सायन्स कॉलेज
8. एटापल्ली — भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय
संबंधित युवक-युवतींनी सकाळी १०.०० वाजता नियोजित ठिकाणी उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रा. रमेश बारसागडे यांनी सेवा संकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा, विधानसभा, मंडळ, शहर, शक्तीकेंद्र व बूथ स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या रोजगार मेळाव्याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने आपल्या स्तरावर गावागावातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींशी संपर्क साधून त्यांना मेळाव्याची माहिती द्यावी आणि सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले.
“सेवा संकल्प अभियानाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. रोजगाराच्या शोधात असलेला कोणताही युवक केवळ माहितीअभावी या संधीपासून वंचित राहू नये. गावागावातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींपर्यंत रोजगार मेळाव्याची माहिती पोहोचवून त्यांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या स्तरावर प्रयत्न करावेत,” असे आवाहन भाजपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी केले आहे.








