
मानव-वन्यजीव संघर्षावर विशेष कृती आराखडा तयार करा; आमदार डॉ. मिलिंद नरोटे
वनमंत्री नाईक यांची भेट;गडचिरोलीतील वनसंपदा, वन्यजीव संरक्षण आणी स्थानिक रोजगारासाठी विविध उपाययोजनांचा पाठपुरावा
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना नौकरी द्या: भरपाई 50 लाखापर्यंत वाढवण्याची मागणी
दि.20/08/2026
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील वनसंपदा, वन्यजीव संरक्षण, वाढता मानव-वन्यजीव संघर्ष तसेच स्थानिक रोजगाराच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री ना. गणेशजी नाईक यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
गडचिरोली जिल्ह्यात वाघ व हत्तींच्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीवितासह शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी वनमंत्र्यांकडे केली.
हत्तींच्या वाढत्या उपद्रवावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक युवकांना विशेष प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित स्थानिक पथके तयार करावीत, अशी मागणीही त्यांनी केली. या मागणीला वनमंत्री ना. गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी भरपाई ५० लाख रुपयांपर्यंत वाढवावी तसेच मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी द्यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणीही आमदार डॉ. नरोटे यांनी केली.
वनसंपदेतून रोजगारनिर्मितीवर भर
गडचिरोलीची समृद्ध वनसंपदा ही स्थानिक रोजगारनिर्मिती आणि आर्थिक सक्षमीकरणाची मोठी संधी आहे. वनआधारित उद्योगांना चालना देऊन स्थानिक नागरिकांना त्याचा अधिकाधिक लाभ मिळावा, तसेच बचत गट, युवक आणि स्थानिक उद्योजकांना वनसंपदेशी निगडित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, याबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी वनमंत्र्यांना गडचिरोली जिल्हा भेटीचे निमंत्रण देण्यात आले.
पर्यटन व वन्यजीव सुविधांच्या विकासाचा प्रस्ताव
गडचिरोलीतील पर्यटन व पर्यावरणपूरक सुविधांच्या विकासासाठी फॉरेस्ट डेपो परिसरात वॉकिंग ट्रॅक, चामोर्शी (सोनापूर) येथे इको पार्क, सेमाना उद्यान परिसरात बायोडायव्हर्सिटी पार्क व प्राणीसंग्रहालय विकसित करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच वन्यजीवांच्या उपचारासाठी आणि जखमी व संकटग्रस्त प्राण्यांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र ट्रान्झिट सेंटर उभारण्याचाही प्रस्ताव आमदार डॉ. नरोटे यांनी मांडला.
वनजमिनीचा रोजगारासाठी उपयोग करण्याची मागणी
मुख्य चौक परिसरातील उपलब्ध वनजमिनीचा नियोजनबद्ध वापर करून स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना देण्याबाबतही चर्चा झाली. या माध्यमातून बचत गट, स्थानिक उद्योजक आणि युवकांना सहभागी करून घेण्याची भूमिका मांडण्यात आली.
गडचिरोलीची वनसंपदा हा केवळ नैसर्गिक वारसा नसून संवर्धनासोबतच विकास, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक सक्षमीकरणाची मोठी संधी आहे. मानव-वन्यजीव संघर्षावर प्रभावी तोडगा, वनसंपदेचे संवर्धन आणि स्थानिकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी यावेळी स्पष्ट केले.








