Home गडचिरोली इंजेक्शननंतर 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू ? घटनेची सखोल चौकशीसाठी पञकार संघटना आक्रमक

इंजेक्शननंतर 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू ? घटनेची सखोल चौकशीसाठी पञकार संघटना आक्रमक

0
21

इंजेक्शननंतर 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू ? घटनेची सखोल चौकशीसाठी पञकार संघटना आक्रमक

 

सिरोंचा : गडचिरोली येथे मोफत हृदय तपासणी शिबिरासाठी सिरोंचा ग्रामीण रुग्णालय येथे आलेल्या ५ वर्षीय मुलाची इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याच्या घटनेची निष्पक्ष, सखोल व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी तालुका पत्रकार संघटना, सिरोंचाच्या वतीने करण्यात आली आहे.रंगयापल्ली येथील मोहन मलय्या चेन्नूरी व गंगू मोहन चेन्नूरी यांचा ५ वर्षीय मुलगा श्रावीण चेन्नूरी याला ५ जुलै रोजी गडचिरोली येथे होणाऱ्या ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या मोफत हृदय तपासणी शिबिरासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती. त्यानुसार कुटुंबीय मुलाला घेऊन ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा येथे आले होते.कुटुंबीयांच्या निवेदनानुसार, ४ जुलै रोजी रात्री रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २, बेड क्रमांक १ येथे मुलाला ठेवण्यात आले. त्यानंतर ड्युटीवर असलेल्या सिस्टरने मुलाला इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चेन्नूरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.या पार्श्वभूमीवर पत्रकार संघटनेने वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, गडचिरोली यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.मुलाला नेमके कोणते इंजेक्शन देण्यात आले, त्याचे नाव, बॅच क्रमांक, उत्पादन व कालबाह्यता तारीख, इंजेक्शनची मात्रा व ते देण्याचे वैद्यकीय कारण याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच इंजेक्शन देण्यापूर्वी मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती का, डॉक्टरांची परवानगी घेण्यात आली होती का, इंजेक्शननंतर प्रकृती बिघडल्यानंतर कोणते उपचार करण्यात आले आणि कोणत्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपचार केले, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.याशिवाय रुग्णालयातील CCTV फुटेज, औषध व इंजेक्शन स्टॉक रजिस्टर, केसपेपर, उपचार नोंदी आणि औषध प्रशासन नोंदवही सुरक्षित ठेवून त्यांची तपासणी करण्यात यावी. शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय व प्रयोगशाळा अहवालांच्या सत्यप्रती कुटुंबीयांना देण्यात याव्यात तसेच स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत चौकशी करून अहवाल कुटुंबीयांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.चौकशीत वैद्यकीय निष्काळजीपणा अथवा संबंधित व्यक्तीची जबाबदारी निश्चित झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच शासनाच्या लागू नियमांनुसार बाधित कुटुंबाला आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.निवेदन देताना तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सागर मूलकला, उपाध्यक्ष मुरलीधर मारगोनी, सचिव अशोक कुम्मरी, पत्रकार चंद्रन्ना पुलगम, श्याम बेज्जनीवार, संपत अंबाला यांच्यासह अन्य पत्रकार बांधव व रंगयापल्ली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, निवेदन प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत बाधित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. घटनेची सत्यता व मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अधिकृत चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!