
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पाठपुराव्याला यश; गडचिरोलीच्या क्रीडा विकासाला मिळणार अत्याधुनिक सुविधांचे बळ
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंना अत्याधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आज दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाच्या टप्पा क्रमांक २ मधील विविध क्रीडा सुविधा व पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पासाठी ₹८० कोटी १२ लाखांच्या निधीला मान्यता मिळाली आहे.
या निर्णयामुळे गडचिरोलीच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, जिल्ह्यातील युवा तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
जिल्हा क्रीडा संकुलाच्या टप्पा क्रमांक २ अंतर्गत ४०० मीटर सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक, आधुनिक स्विमिंग पूल, खेळाडूंसाठी हॉस्टेल, आधुनिक क्रीडा साहित्य व स्पोर्ट्स इक्विपमेंट्स, प्रेक्षकांसाठी गॅलरी, कंपाउंड वॉल तसेच विविध अत्याधुनिक क्रीडा व पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद सगुनाबाई रामजी नरोटे यांनी जिल्हा क्रीडा संकुलाच्या टप्पा क्रमांक २ साठी सातत्याने पाठपुरावा केला. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन क्रीडामंत्री दिवंगत अजितदादा पवारसाहेब तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्याकडे या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रकल्पाला गती दिली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या या महत्त्वपूर्ण मंजुरीबद्दल आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
या प्रकल्पासाठी क्रीडा विभागाचे सचिव श्री. रणजितसिंहजी देओल, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी श्री. अविश्यांतजी पंडा, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. भास्करजी घटाळे तसेच प्रकल्पाचे कन्सल्टंट श्री. सुधीरजी श्रीवास्तव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांचेही आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आभार व्यक्त केले.
या अत्याधुनिक क्रीडा संकुलामुळे गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंना सराव, प्रशिक्षण आणि विविध स्पर्धांसाठी आवश्यक सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहेत. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळून गडचिरोलीतून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्यास निश्चितच मदत होणार आहे.
“क्रीडा विकास म्हणजे युवा शक्तीचा विकास आणि युवा शक्तीचा विकास म्हणजे गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्याचा विकास,” या भावनेतून जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी पुढील काळातही सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, असे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सांगितले.








