Home गडचिरोली आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ कार्यशाळेचा दुसरा दिवस आज :विविध...

आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ कार्यशाळेचा दुसरा दिवस आज :विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन; जिल्ह्याच्या विकासासाठी व्यापक विचारमंथन

0
25
Oplus_0

आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ कार्यशाळेचा दुसरा दिवस आज :विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन; जिल्ह्याच्या विकासासाठी व्यापक विचारमंथन

 

गडचिरोली : आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला दिशा देण्यासाठी १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी आर. के. सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचा २०४७ पर्यंत सर्वांगीण, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास कसा साधता येईल, यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, अधिकारी, तज्ज्ञ आणि नागरिक या कार्यशाळेत सहभागी होत आहेत.

 

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गडचिरोलीच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर आपली मते मांडली. त्यांच्या मौलिक सूचना आणि सहभागाबद्दल आयोजकांच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले.

 

दुसऱ्या दिवशी मान्यवरांचे मार्गदर्शन

 

कार्यशाळेच्या १७ ऑगस्ट रोजीच्या दुसऱ्या दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार असून, त्यामध्ये मा. राज्यसभा खासदार मायाताई इवनाते, चिमूरचे आमदार तथा गडचिरोली जिल्ह्याचे भाजपा प्रभारी बंटी भांगडिया, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी आणि आदिवासी समाजसेवक देवाजी तोफा यांचा सहभाग राहणार आहे.

 

तसेच समाज कल्याण सहआयुक्त डॉ. सचिन मडावी, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहआयुक्त समीर डोंगरे, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापक एच. एम. बोरोले, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्यवस्थापक मुकुंद मेश्राम आणि जिल्हा कृषी विभागाच्या प्रिती हिरवळकर हे आपल्या-आपल्या विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाच्या संधी व आव्हानांवर मार्गदर्शन करणार आहेत.

 

याशिवाय एससी/एसटी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शिवसेना शिंदे गटाचे हेमंत जंबेवार, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष माधव गावळ, आदिवासी विकास परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा सचिव विद्या दुग्गा, शहर अध्यक्ष आरती कोल्हे, उमेश उईके, अमोल कुळमेथे आणि प्रा. अनिल होळी यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.

 

विकासाच्या विविध विषयांवर होणार मंथन

 

या कार्यशाळेत गडचिरोली जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग, शेती, सिंचन, मत्स्य व्यवसाय, पर्यटन, वनसंपदा, आदिवासी विकास, महिला सक्षमीकरण, सहकार, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा यांसह विविध महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन करण्यात येणार आहे.

 

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाच्या योजनांसोबतच स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे अनुभव आणि सामाजिक संस्थांच्या सूचना यांचा समावेश करून २०४७ पर्यंतचा व्यापक विकास आराखडा तयार करण्याचा प्रयत्न या कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

 

जिल्हावासीयांना सहभागी होण्याचे आवाहन

 

या कार्यशाळेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ कृती/निर्माण समिती’च्या वतीने करण्यात आले आहे.

 

जिल्हावासीयांना आर. के. सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यशाळेत सहभागी होता येणार असून, ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही त्यांनी Google Meet आणि Facebook Liveच्या माध्यमातून कार्यशाळेचा सहभाग व लाभ घ्यावा, असे आयोजकांनी सांगितले.

 

गडचिरोलीला २०४७ पर्यंत विकसित, आत्मनिर्भर, रोजगारक्षम आणि सर्वसमावेशक जिल्हा बनविण्यासाठी ‘विकासाची दिशा ठरविण्यात प्रत्येक नागरिकाचा सहभाग’ या भूमिकेतून आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा जिल्ह्याच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!