
अभियंता साखरवाडे यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी अरविंद कात्रटवार आक्रमक; सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे चौकशी व कारवाई ची मागणी
कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या कामकाजावर गंभीर आरोप; काञटवार यांनी मांडले विविध मुद्दे
आमदार मिलिंदजी नरोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख मा. राकेशभाऊ बेलसरे, सामाजिक कार्यकर्ते यादवजी लोहंबरे यांची प्रामुख्याने उपस्थिती
तातडीने फौजदारी कारवाई करून गडचिरोली जिल्ह्यातून हक्कालपट्टी करण्याची मागणी
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्याविरोधात कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे तसेच त्यांची गडचिरोली जिल्ह्यातून हक्कालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची नुकतीच भेट घेऊन लक्ष वेधले.
भेटीदरम्यान अरविंदभाऊ कात्रटवार यांनी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासमोर कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या कथित गैरकारभार व भ्रष्टाचारासंदर्भातील विविध मुद्दे मांडले. एक अधिकारी तब्बल ८ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत कसा राहू शकतो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अरविंदभाऊ कात्रटवार यांनी सहपालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की, कार्यकारी अभियंता साखरवाडे यांच्या कामकाजासंदर्भात अनेक प्रकरणे समोर आणून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही शासकीय यंत्रणेकडून अपेक्षित हालचाल दिसून आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
कोरची तालुक्यातील नाडेकल–बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवर अंदाजे ५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला पुल रहदारी सुरू होण्यापूर्वीच कोसळल्याचा दावा यावेळी करण्यात आला. संबंधित पुलाच्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर निकृष्ट दर्जाचे काम करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कात्रटवार यांनी केला.
तसेच २०२५–२६ या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती व पुल दुरुस्तीच्या सुमारे ५० कोटी रुपयांच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा, तसेच काही कामे न करताच बिले काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
याशिवाय मागील ३ वर्षांत सुमारे ५ हजार कामांच्या ऑफलाईन निविदा नियमबाह्य पद्धतीने काढण्यात आल्या असून संबंधित कामे केवळ मजूर सहकारी संस्थांना २० टक्के दराने विकल्याचा आरोपही त्यांनी केला.
कार्यालयीन वातावरणाबाबतही गंभीर मुद्दे उपस्थित करत कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांचे महिला कर्मचाऱ्यांशी वर्तन योग्य नसल्याचा आरोप करण्यात आला. कार्यालयात उपस्थित असलेल्या इतर व्यक्ती व कंत्राटदारांसमोर महिला कर्मचाऱ्यांशी अयोग्य भाषेत संवाद साधला जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. शासकीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे हे शासकीय नियम धाब्यावर बसवून हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत असल्याचा आरोप करत, जनतेचा शासन व प्रशासनावरील विश्वास कायम ठेवण्यासाठी त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून सेवेतून निलंबित करण्यात यावे तसेच गडचिरोली जिल्ह्यातून तात्काळ हक्कालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे केली.
( वरील सर्व आरोप हे संबंधित व्यक्तींनी केलेल्या निवेदनातील दावे असून संबंधित अधिकारी किंवा विभागाची अधिकृत भूमिका उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध केली जाईल.)








