
मुंबई उपनगरातील आदिवासी पाड्यांवरील समस्यांबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष आदिवासी मोर्चा डॉ. देवराव होळी यांचे मार्गदर्शन
कांदीवली तालुक्यातील कलमांचा पाडा येथे आदिवासी बांधवांशी संवाद; वनहक्क, आरोग्य, पाणी, रोजगार व शिक्षणाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा
मुंबई – मुंबई उपनगर जिल्ह्यातील कांदीवली तालुक्यातील कलमांचा पाडा या आदिवासी पाड्यावर भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी समाज बांधवांसोबत संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या व त्यावर मार्गदर्शन केले. स्वातंत्र्याच्या 78 वर्षात या पाड्यांवर अजून पर्यत एकही लोकप्रतिनिधीनी बैठक घेऊन या ठिकाणच्या समस्या जाणून घेतल्या नाही. परंतु पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी व आदिवासी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी सभा घेऊन या पाड्यांवरच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. या बैठकीत मालाड, कांदिवली, बोरिवली व दहिसर परिसरातील निंबोनी पाडा, बारीक पाडा, कलमांचा पाडा, देवी पाडा, आकाराची भट्टी पाडा, पाताचे पाणी, चिंच पाडा, राजनी पाडा, डॅम पाडा, धारखाडी पाडा, केतकी पाडा आदी पाड्यांमधील शेकडो आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंचावर सुनील सुमडे (कार्याध्यक्ष, वनहक्क समिती दहिसर), सचिन मोहनकर (अध्यक्ष, वनहक्क समिती मालाड), रघुनाथ कलांगडे, अर्जुन वैजल (पाडा प्रमुख, कलमांचा पाडा), मच्छिन्द्र वैजल (सचिव, वनहक्क समिती कांदिवली), अर्जुन तळेकर (अध्यक्ष, वनहक्क समिती कांदिवली), दिलीप चौधरी (पाडा प्रमुख, देवी पाडा), महेश हबाले (पाडा प्रमुख, आकाराची भट्टी), मोहन सोनवणे (महासचिव, राष्ट्रीय आदिवासी एकता मंच) आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेदरम्यान आदिवासी समाज बांधवांनी वनहक्काचे सामूहिक दावे, नागरिकांना आवश्यक दाखले मिळण्यात येणाऱ्या अडचणी, आरोग्य सुविधा, रस्ते, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, प्रकल्प कार्यालयातून मिळणारे लाभ, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मुंबई उपनगरात स्पर्धा परीक्षा केंद्र उपलब्ध करून देणे, अधिक बालकसंख्या असलेल्या पाड्यांवर अंगणवाडी सुरू करणे, महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण, राशन कार्ड संदर्भातील अडचणी, ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी सहकार्य, तसेच आदिवासी संस्कृती जपण्यासाठी दरवर्षी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याची मागणी मांडली.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी समाजाच्या समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. वनहक्क प्रकरणांमध्ये आदिवासी बांधवांनी संघटितपणे पुढे येण्याचे आवाहन करत त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे सांगितले.
आरोग्य सुविधांबाबत बोलताना त्यांनी आदिवासी पाड्यांवरील रुग्णांना शासकीय रुग्णालयात प्राधान्याने उपचार मिळावेत, यासाठी संबंधित प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल असे नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण आणि मूलभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
आदिवासी संस्कृती, पूजा पद्धती आणि पारंपरिक जीवनशैली जतन करण्यासाठी मुंबई उपनगरात दरवर्षी भव्य आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित व्हावा, ही समाजाची मागणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी वारसा जपण्यासाठी समाजाने एकत्रितपणे पुढे येण्याचे आवाहन केले.








