Home गडचिरोली  गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची धडक पाहणी; पोलीस...

 गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची धडक पाहणी; पोलीस भरती उमेदवारांच्या अडवणुकीवर संताप, प्रशासनाला कडक इशारा

0
24

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची धडक पाहणी; पोलीस भरती उमेदवारांच्या अडवणुकीवर संताप, प्रशासनाला कडक इशारा

दिं. 12/05/2026

 

गडचिरोली: जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवा, स्वच्छता व्यवस्था आणि पोलीस भरतीसाठी आवश्यक मेडिकल प्रमाणपत्र प्रक्रियेमधील गंभीर त्रुटींवर आज आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी थेट रुग्णालयात जाऊन धडक पाहणी करत प्रशासनाला जाब विचारला. त्यांच्या या अचानक भेटीमुळे रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली.

 

यावेळी आमदार नरोटे यांनी रुग्णालयातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करत रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा सखोल आढावा घेतला. विशेषतः रुग्णालयातील स्वयंपाकगृहात जाऊन त्यांनी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, आहाराचा दर्जा आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची व्यवस्था अत्यंत बारकाईने तपासली. रुग्णांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी कडक सूचना दिल्या.

 

दरम्यान, पोलीस भरती प्रक्रियेसाठी मेडिकल सर्टिफिकेट मिळविण्यासाठी आलेल्या उमेदवारांची मोठ्या प्रमाणात होत असलेली गैरसोय आमदार नरोटे यांच्या निदर्शनास आली. पात्र उमेदवारांना तब्बल १२ दिवसांपासून रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून, सकाळपासून रात्रीपर्यंत रांगेत उभे राहून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी उमेदवारांनी मांडल्या.

 

यावर आमदार नरोटे यांनी तीव्र संताप व्यक्त करत, “ग्रामीण भागातील गरीब व कष्टकरी युवक पोलीस भरतीसाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. अशा युवकांना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे वेठीस धरणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा दिला.

 

उमेदवारांकडून वारंवार ‘रिपीटेड टेस्ट्स’च्या नावाखाली अडवणूक केली जात असल्याची बाब समोर आल्यानंतर आमदार नरोटे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लहाडे मॅडम यांना कडक शब्दांत जाब विचारला. “जाणीवपूर्वक टाळाटाळ करून युवकांचे भविष्य अंधारात ढकलण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,” अशी सक्त ताकीद देत सर्व प्रलंबित मेडिकल सर्टिफिकेट्स तातडीने निकाली काढण्याचे आदेश त्यांनी दिले.

 

या धडक पाहणीमुळे पोलीस भरती उमेदवारांमध्ये मोठा दिलासा निर्माण झाला असून, युवकांच्या न्यायासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे मैदानात उतरल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. नरोटे यांच्या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव श्री रमेशजी भुरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री अनिलजी पोहनकर, डॉ. भारतजी खटी, डॉ. उईके, डॉ. गेडाम, डॉ. पेंदाम तसेच डॉ. दुर्वे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!