Home गडचिरोली आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रयत्नांना यश; गडचिरोली विधानसभा मतदारसंघासाठी ४३ कोटी...

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रयत्नांना यश; गडचिरोली विधानसभा मतदारसंघासाठी ४३ कोटी ४० लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी

0
28

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रयत्नांना यश; गडचिरोली विधानसभा मतदारसंघासाठी ४३ कोटी ४० लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी

 

सार्वजनिक बांधकाम विभागा अतंर्गत रस्ते व पुलांच्या कामांना गती; नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतुकीचा लाभ

 

गडचिरोली | प्रतिनिधी

 

गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी तब्बल ४,३४०.७३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या मार्गांची सुधारणा होणार असून नवीन पुलांच्या बांधकामामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होणार आहे.

 

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था बिकट होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर मंजूर झालेल्या निधीतून रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण तसेच आवश्यक ठिकाणी पुलांचे बांधकाम करण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मोठ्या प्रमाणात सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

या विकासकामांमुळे विशेषतः दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. शेतमाल बाजारात नेणे, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवास करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. परिणामी, ग्रामीण भागाचा शहरांशी संपर्क अधिक मजबूत होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.

 

या निधीमुळे मतदारसंघातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असून विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. रस्ते व पुलांच्या कामांमुळे केवळ वाहतूकच नव्हे तर पर्यटन, व्यापार आणि सामाजिक संपर्क यांनाही प्रोत्साहन मिळणार असल्याचे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

दरम्यान, या निधीबाबत प्रतिक्रिया देताना आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सांगितले की, “गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. रस्ते व पुलांची उभारणी ही ग्रामीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या कामांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल होईल.”

 

तसेच या महत्त्वपूर्ण निधीस मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही मतदारसंघातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी विविध विकासकामे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!