
प्रभाग क्र. 3 स्नेहनगर शिव मंदिरात महाशिवरात्रीचा भक्तिमय सोहळा उत्साहात संपन्न
नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निबोंरकर, बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर व नगरसेवक सागर निबोंरकर यांची प्रमुख उपस्थिती
भाविकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना; प्रभाग विकासाबाबत नागरिकांशी ठोस संवाद
15/02/2026
गडचिरोली : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त प्रभाग क्र. 3, स्नेहनगर येथील शिव मंदिरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. “हर हर महादेव”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या शुभप्रसंगी नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निबोंरकर व बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, नगरसेवक सागर निंबोरकर यांनी मंदिरात उपस्थित राहून भगवान शंकराची विधिवत पूजा-अर्चा केली. मंत्रोच्चार, अभिषेक व आरतीच्या माध्यमातून त्यांनी महादेवाच्या चरणी नतमस्तक होत शहरवासीयांच्या सुख-समृद्धी, आरोग्य व आनंदासाठी प्रार्थना केली.
यावेळी नागरिकांशी संवाद साधतांना नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निबोंरकर यांनी सांगितले की, धार्मिक स्थळे ही समाजातील एकात्मतेची व संस्कारांची केंद्रे आहेत. स्नेहनगर शिव मंदिर परिसर व आपला प्रभाग अधिक स्वच्छ, सुशोभित व सुविधायुक्त करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून आवश्यक ती पावले उचलली जातील. भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्राथमिक जबाबदारी असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंदिर समितीच्या वतीने नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निबोंरकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.
बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर यांनी प्रभागाच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छता, अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. आणी मंदिरातील धार्मिक कार्यक्रम अधिक सुसज्ज पद्धतीने पार पडावेत या उद्देशाने स्पीकर संच भेट दिला. हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.
नगरसेवक सागर निबोंरकर यांनीही भाविकांशी संवाद साधत धार्मिक स्थळांचा विकास आणि परिसरातील आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी स्थानिक नागरिक, महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरती, भजन-कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. श्रद्धा, ऐक्य आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देत महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.








