
पद्मविभूषण स्व. सुषमाजी स्वराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन; भाजपा महिला मोर्चाच्या संमेलनात कृतज्ञ स्मरण
गडचिरोली : उत्कृष्ट संसदीय परंपरा, प्रभावी वक्तृत्व आणि लोकाभिमुख कार्यशैलीच्या बळावर भारतीय राजकारणात अमिट ठसा उमटविणाऱ्या भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री तथा पद्मविभूषण स्व. सुषमा स्वराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित संमेलनात भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना सौ. योगिताताई प्रमोदराव पिपरे, नगरसेविका (माजी नगराध्यक्ष) तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी यांनी स्व. सुषमाजींच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. “देशहितासाठीची त्यांची निष्ठा, परराष्ट्र धोरणातील ठाम भूमिका आणि जगभर अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांना तत्पर मदत करण्याची संवेदनशीलता ही त्यांची खरी ओळख होती. त्यांचे कार्य आजही प्रत्येक महिला कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आहे,” असे त्या म्हणाल्या.
सुषमाजी स्वराज यांनी संसदेत केलेले प्रभावी भाषण, परराष्ट्र मंत्री म्हणून घेतलेले धाडसी निर्णय आणि सर्वसामान्य नागरिकांप्रती असलेली आपुलकी यामुळे त्या देशाच्या राजकारणात वेगळे स्थान निर्माण करून गेल्या. त्यांच्या कार्यशैलीत दृढ नेतृत्वासोबतच मातृत्वाची करुणा दिसून येत असे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. खासदार अशोकराव नेते, मा. आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, मा. बाबुराव कोहळे, मा. प्रमोदराव पिपरे (संचालक, महाराष्ट्र राज्य सहकार संघ मर्यादित, पुणे), मा. रमेश भुरसे, मा. सौ. रेखाताई डोळस, सौ. डॉ. चंदाताई कोडवते, सौ. अर्चनाताई बोरकुटे, सौ. सीमाताई कन्नमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महिला मोर्चाच्या पदाधिकारी, नगरपरिषद सभापती, नगरसेवक व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनात सुषमाजींच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या आदर्श विचारांवर चालण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमात देशभक्तीपूर्ण वातावरणात स्व. सुषमाजी स्वराज यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.








