Home गडचिरोली गोविंदपूर टोल नाका परिसरात ST बसचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

गोविंदपूर टोल नाका परिसरात ST बसचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

0
24
Oplus_0

गोविंदपूर टोल नाका परिसरात ST बसचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

 

ब्रम्हपुरी–अहेरी मार्गावरील बस व ट्रकची जोरदार धडक; काही काळ वाहतूक ठप्प

 

दिं 09/02/2026

गडचिरोली :गडचिरोली–चामोर्शी मार्गावरील गोविंदपूर टोल नाका परिसरात आज सोमवार (दि. ९ फेब्रुवारी २०२६) रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) बस आणि एका ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता मोठी असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब ठरली आहे.

 

ब्रम्हपुरी आगाराची ब्रम्हपुरी–अहेरी मार्गावर धावणारी एसटी बस (क्रमांक MH-40 Y 5537) गोविंदपूर टोल नाक्याजवळ पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडकली. प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. जोरदार धडकेमुळे एसटी बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

अपघाताच्या वेळी बसमध्ये प्रवासी उपस्थित होते. अचानक झालेल्या धडकेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णवाहिकेद्वारे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दाखल करण्यात आले.

 

अपघातानंतर गोविंदपूर टोल नाका परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे गडचिरोली–चामोर्शी मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णतः विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस, वाहतूक कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य करत परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्काळ उपाययोजना केल्या.

 

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष खबरदारी घ्यावी, वाहनांमधील सुरक्षित अंतर राखावे तसेच वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!