
ग्रामपंचायत जप्राबाद अंतर्गत टेकडा ताला येथे पोचमा देवी बोनलू उत्सव भक्तिभावात व उत्साहात साजरा
गडचिरोली:सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागात वसलेल्या ग्रामपंचायत जप्राबाद अंतर्गत टेकडा ताला येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक व श्रद्धेचा प्रतीक असलेला पोचमा देवी बोनलू उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.
या पावन बोनलू उत्सवानिमित्त ऑल इंडिया युथ फेडरेशनचे तालुका सचिव रवि बारसागंडी यांनी आपल्या परिवारासह पोचमा देवीचे विधिवत दर्शन घेतले. देवीच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी परिसरातील नागरिकांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, शांतता, सामाजिक सलोखा तसेच भरभराटीसाठी मनोभावे प्रार्थना केली.
पोचमा देवी बोनलू हा उत्सव आदिवासी समाजाच्या श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात पाहायला मिळाली. पारंपरिक पूजन विधी, देवीची आरती, नवसपूर्ती व श्रद्धेने भरलेले वातावरण यामुळे संपूर्ण टेकडा ताला गाव उत्सवमय झाले होते.
बोनलू उत्सवाच्या निमित्ताने गावकऱ्यांमध्ये एकोपा, आपुलकी व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. आदिवासी संस्कृतीतील पारंपरिक रितीरिवाज जपले जात असल्याने हा उत्सव पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
हा पोचमा देवी बोनलू उत्सव परिसरातील धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक ऐक्य अधोरेखित करणारा ठरला.








