
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकार खंबीर; पालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गडचिरोलीत प्रमाणपत्र वितरण
गडचिरोली :
दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महायुती सरकार ठोसपणे कार्यरत असून, प्रत्येक दिव्यांगाला सन्मानाचे जीवन मिळावे यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे सहपालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अॅड. आशिषजी जयस्वाल यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आयोजित भव्य दिव्यांग प्रमाणपत्र एकत्रित वितरण सोहळ्यात पालकमंत्री ना. अॅड. आशिषजी जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे हेही उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधत सांगितले की, दिव्यांग व्यक्तींच्या शिक्षण, रोजगार, आरोग्य व सामाजिक सुरक्षेसाठी शासन विविध योजना प्रभावीपणे राबवत आहे. दिव्यांग प्रमाणपत्रे ही केवळ कागदपत्रे नसून, ती दिव्यांगांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणारे महत्त्वाचे साधन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत, दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असे सांगितले. दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यास आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विविध विभागांचे प्रतिनिधी तसेच दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे दिव्यांग बांधवांमध्ये समाधानाचे व आश्वासक वातावरण निर्माण झाले.








