
साईनगर वॉर्डात ओवरलोड रेती–गिट्टी टिपरांचा उच्छाद; प्रशासन निष्क्रिय, नागरिकांच्या जीविताशी थेट खेळ
अरुंद रस्त्यांवर भरधाव अवजड वाहनांचा धुडगूस; विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका
गडचिरोली : शहरातील साईनगर वॉर्डात रेती व गिट्टी वाहून नेणाऱ्या ओवरलोड टिपर वाहनांचा मोकाट सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत असून, नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे भयावह चित्र समोर येत आहे. भरधाव वेगाने धावणारी ही अवजड वाहने म्हणजे जणू नागरिकांच्या जीवावर उठलेला मृत्यूचा सापळाच बनली असून, प्रशासन मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
आज सायंकाळी सुमारे ४.०० ते ४.१५ वाजताच्या सुमारास, कारमेल शाळेच्या मागील साईनगर मार्गावरून रेतीने ओवरलोड केलेली टिपर वाहने अत्यंत वेगाने धावत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे हा मार्ग अतिशय अरुंद, सिंगल आणि वस्तीमधून जाणारा असून, याच रस्त्याचा वापर शाळकरी विद्यार्थी, लहान मुले, सायकलस्वार, महिला व पादचारी मोठ्या प्रमाणावर करतात. अशा ठिकाणी अवजड आणि ओवरलोड वाहनांची बेदरकार वाहतूक म्हणजे अपघाताला उघड आमंत्रण असल्याची तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रेती व गिट्टी वाहतुकीदरम्यान मंजूर रॉयल्टीपेक्षा कितीतरी पटीने अधिक साठा वाहून नेला जात आहे. इतकेच नव्हे तर, वाहतुकीदरम्यान रेती व गिट्टी रस्त्यावर सांडल्याने रस्त्यावर घसरण निर्माण होत असून, मागून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी ती मोठी धोक्याची बाब ठरत आहे. यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
“जर साईनगर वॉर्डात उद्या एखादी मोठी दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा थेट सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. साईनगर परिसरातील रेती- गीठ्ठी ओवरलोड टिपर वाहतूकिकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे .
साईनगर वॉर्डातील नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने ओवरलोड टिपर वाहनांवर कडक कारवाई, वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी, रॉयल्टी तपासणी व वस्ती भागातून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची जोरदार मागणी केली आहे.
अन्यथा, नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट इशाराही स्थानिकांनी दिला आहे.








