Home गडचिरोली शिस्त आणी संस्कारातूनच घडते यशस्वी पिढी – डीवायएसपी सुरज जगताप

शिस्त आणी संस्कारातूनच घडते यशस्वी पिढी – डीवायएसपी सुरज जगताप

0
19

शिस्त आणी संस्कारातूनच घडते यशस्वी पिढी – डीवायएसपी सुरज जगताप

 

चामोर्शी :

शाळकरी विद्यार्थ्यांनी कारकिर्दीत यश संपादन करून ते टिकवायचे असेल, तर अभ्यासासोबतच शिस्त आचरणात आणणे तितकेच महत्त्वाचे आहे. शिस्तीचा लाभ विद्यार्थ्यांच्या संपूर्ण आयुष्यात होत असतो, असे प्रतिपादन गडचिरोलीचे डीवायएसपी सुरज व्ही. जगताप यांनी केले.

 

ते चामोर्शी येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित बक्षीस वितरण व व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात ‘युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

 

यावेळी डीवायएसपी जगताप यांनी जिल्हा परिषद शाळांमधून विविध क्षेत्रांत अनेक अधिकारी घडले असून, या महाविद्यालयातूनही भविष्यात अनेक यशस्वी विद्यार्थी घडतील, असा आशावाद व्यक्त केला.

 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी युवा वक्ते तुषार दुधबावरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महाविद्यालयीन वय हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा महत्त्वाचा काळ असतो. या काळात योग्य दिशा मिळाल्यास विद्यार्थी घडतो, अन्यथा कुसंगतीमुळे संपूर्ण आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे देशाला ‘सुशिक्षित तसेच सुसंस्कारित पिढी’ अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

यावेळी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले सुरज मेकर्तीवार यांनी ‘पॉक्सो’ कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. कायदे हे समाजपरिवर्तन व सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी असतात. प्रत्येक विद्यार्थ्याने कायदे व आपली कर्तव्ये जाणून त्यांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी ज्येष्ठ शिक्षक अविनाश तालापल्लीवार यांच्या संकल्पनेतून चामोर्शी शहरात प्रथमच देशातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी राष्ट्रीय एकात्मता रॅली आयोजित करण्यात आली होती.

 

कार्यक्रमाला मान. मंदाताई वानखेडे (अध्यक्षा, व्यवस्थापन समिती), प्रकाश गेडाम (सिनेट सदस्य, नागपूर विद्यापीठ), वाहतूक निरीक्षक किरण शिंदे, प्रेमाताई आईंचवार (अध्यक्षा, भौ. वि. व वि.सु. समिती), नगरसेविका, सुधीर गडपायले, ललिता गडपायले, प्राचार्या मीना गदेवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

 

या व्याख्यानमालेला शेकडो विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्नेहल टिचकुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक अविनाश तालापल्लीवार यांनी केले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!