
एक दिवा वंचितांसाठी… पाळावरची दिवाळी दिवाळीचा आनंद वंचितांच्या दारी; भटक्या समाजातील कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप
चामोर्शी, दि. ११ नोव्हेंबर २०२६ :
दिवाळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा आणि आपुलकीचा संदेश देणारा सण आहे. समाजातील प्रत्येक घटकाला दिवाळीचा आनंद घेता यावा, तसेच गरजू आणि वंचित कुटुंबांच्याही घरात आनंदाचा दिवा प्रज्वलित व्हावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘एक दिवा वंचितांसाठी – पाळावरची दिवाळी’ हा उपक्रम चामोर्शी येथे राबविण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशभाऊ बारसागडे यांच्या नेतृत्वात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चामोर्शी परिसरातील भटक्या समाजाच्या पाडा-वस्तीमध्ये जाऊन गरजू व वंचित कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
दिवाळीच्या सणानिमित्त समाजातील अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींमुळे सणाचा आनंद मनमोकळेपणाने साजरा करता येत नाही. अशा कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि त्यांनाही सणाच्या आनंदात सामावून घेणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. केवळ दिवाळीच्या शुभेच्छा न देता प्रत्यक्ष मदतीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पाडा-वस्तीतील कुटुंबांशी संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. किराणा साहित्य मिळाल्याने संबंधित कुटुंबांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या सामाजिक उपक्रमात भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भास्करभाऊ बुरे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा महामंत्री साईनाथजी बुरांडे, भाजपा आदिवासी मोर्चाचे जिल्हा महामंत्री रेवनाथभाऊ कुसराम, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष भाविकजी आभारे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका महामंत्री विनोदभाऊ किरमे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘एक दिवा वंचितांसाठी’ हा उपक्रम म्हणजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आनंद आणि मदतीचा हात पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. दिवाळीचा खरा आनंद हा केवळ स्वतःच्या घरापुरता मर्यादित नसून तो इतरांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे, हा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
समाजातील गरजू, वंचित आणि दुर्लक्षित घटकांना सण-उत्सवाच्या आनंदात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे चामोर्शी परिसरात सामाजिक आपुलकी आणि माणुसकीचा संदेश पोहोचला.








