
जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका; समाजाच्या बैठका समस्या सोडविण्यासाठी असतात, राजकारणासाठी नव्हे — महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात!
२०२० मध्ये संदीप जोशी यांच्या पराभवासाठी ११ मंत्र्यांना सोबत घेऊन जातीपातीचे राजकारण करण्यात आले; यंदा पदवीधर मतदार विरोधकांना धडा शिकवतील — बावनकुळे
काँग्रेसला पुढील ५७ वर्षे निवडणूक लढविण्याची हिंमत होणार नाही, असा ऐतिहासिक विजय मिळवा; महायुतीच्या कार्यकर्त्यांना बावनकुळे यांचे आवाहन!
शिक्षण, रोजगार आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विधान परिषदेत सक्षम नेतृत्व आवश्यक; सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी महायुतीचा निर्धार!
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या नियोजनात झालेल्या भव्य पदवीधर मतदार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!
गडचिरोली, दि. १७ ऑक्टोबर : समाजाच्या नावाखाली जातीपातीची समीकरणे मांडून राजकीय स्वार्थ साधणाऱ्यांपासून पदवीधर मतदारांनी सावध राहावे. समाजाच्या बैठका या समाजातील समस्या सोडविण्यासाठी, शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी आणि युवकांचे भविष्य घडविण्यासाठी असतात; राजकारण करण्यासाठी नव्हेत. २०२० च्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव करण्यासाठी तब्बल ११ मंत्र्यांना सोबत घेऊन जातीपातीचे राजकारण करण्यात आले. मात्र, यावेळी पदवीधर मतदार अशा राजकारणाला बळी पडणार नाहीत. महायुतीचा विजय निश्चित असून, काँग्रेसला पुढील ५७ वर्षे निवडणूक लढविण्याची हिंमत होणार नाही, असा ऐतिहासिक विजय मिळविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार, माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी गडचिरोली शहरातील आरमोरी रोडवरील सुमानंद हॉल येथे आयोजित भव्य पदवीधर मतदार मेळाव्यात ते बोलत होते. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या नियोजनात पार पडलेल्या या मेळाव्याला पदवीधर मतदारांसह महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
२०२० च्या पराभवाची आठवण करून देत काँग्रेसवर हल्लाबोल!
ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२० च्या पदवीधर निवडणुकीचा संदर्भ देत काँग्रेसवर जोरदार टीका केली. संदीप जोशी यांच्या विरोधात जातीपातीची समीकरणे उभी करून समाजाच्या नावाखाली बैठका घेण्यात आल्या. त्यासाठी ११ मंत्र्यांना सोबत घेऊन नियोजनबद्ध राजकारण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
समाजाच्या व्यासपीठांचा राजकीय फायद्यासाठी वापर करण्याऐवजी शिक्षण, रोजगार, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक एकोप्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. पदवीधर मतदारांनी जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता उमेदवाराची कार्यक्षमता, अनुभव आणि विकासाची दृष्टी विचारात घेऊन मतदान करावे, असे त्यांनी सांगितले.
मागील निवडणुकीतील पराभवाचा राजकीय हिशेब चुकता करण्याची ही संधी असून, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संघटनात्मक ताकद दाखवावी. केवळ विजय मिळविणे हे उद्दिष्ट नसून काँग्रेसला पुढील ५७ वर्षे निवडणूक लढविण्याची हिंमत होणार नाही, इतका मोठा विजय मिळविण्याचा निर्धार करावा, असे बावनकुळे यांनी ठणकावून सांगितले.
पदवीधरांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत सक्षम नेतृत्व आवश्यक!
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही केवळ राजकीय प्रतिष्ठेची नसून उच्चशिक्षित युवकांचे भविष्य, रोजगाराच्या संधी आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांशी संबंधित असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
उच्चशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार, शासकीय नोकरभरतीतील अडथळे दूर करणे, स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, शिक्षकांचे सेवा व वेतनविषयक प्रश्न, जुनी पेन्शन योजना आणि कौशल्य विकास या विषयांना प्राधान्य देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
विशेषतः गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या सुविधा, व्यावसायिक प्रशिक्षण आणि स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. महायुतीचे उमेदवार माजी आमदार सुधाकर कोहळे हे अनुभवी व अभ्यासू नेतृत्व असून पदवीधरांच्या मागण्यांना विधान परिषदेत प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी महायुतीची एकजूट!
या मेळाव्यात महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकदिलाने निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रत्येक नोंदणीकृत पदवीधर मतदारापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेणे, उमेदवाराची भूमिका मांडणे आणि मतदानाबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.
शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, अभियंते, कर्मचारी, व्यावसायिक आणि उच्चशिक्षित बेरोजगार युवकांशी संपर्क साधण्यासाठी संघटनात्मक नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले. शिक्षण, रोजगार, शासकीय नोकरभरती आणि स्थानिक युवकांच्या विकासाच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व विधान परिषदेत पाठविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
मेळाव्याला महायुतीच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती!
या जाहीर पदवीधर मतदार मेळाव्याला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते, चिमूरचे आमदार तथा गडचिरोली जिल्ह्याचे संघटनात्मक प्रभारी कीर्तिकुमार ऊर्फ बंटीभाऊ भांगडिया, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी आमदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर जिल्हाप्रमुख प्रशांत वाघरे, सहकारमहर्षी अरविंद सा. पोरेड्डीवार, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, शिवसेना नेते संदीप ठाकूर, भाजपा नेत्या डॉ. चंदा कोडवते, संजय कुटे आणि आरटीआयचे नेते मेघश्याम घुटके यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच भाजपा जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, डॉ. प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, अनिल पोहनकर, सुरावार सर, रिंकू पापडकर यांच्यासह महायुतीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, प्राध्यापक, उच्चशिक्षित युवक आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.








