
गडचिरोलीत प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सेवा ज्योती यात्रे’चा शुभारंभ
सेवा संकल्प अभियानाला नवी गती; जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या नियोजनात आयोजन
शासनाच्या लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा — प्रा. दिनेश सूर्यवंशी
गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी, गडचिरोलीच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित ‘सेवा ज्योती यात्रे’चा गडचिरोली येथे उत्साहात शुभारंभ करण्यात आला. विदर्भ संयोजक प्रा. दिनेश सूर्यवंशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या नियोजनात या यात्रेचे आयोजन करण्यात आले.
गडचिरोली शहरातील यमुना लॉन येथून यात्रेला प्रारंभ झाला. रेड्डी गोडाऊन चौक, विवेकानंद नगर परिसरातून यात्रेने मार्गक्रमण केले. भाजपचे पदाधिकारी, विविध मोर्चा व आघाड्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सेवा व जनसंपर्काला अधिक बळ द्या — प्रा. दिनेश सूर्यवंशी
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रा. दिनेश सूर्यवंशी म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावावी.
‘सेवा संकल्प अभियान’ हे सेवा, जनसंपर्क आणि सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत करणारे अभियान आहे. गाव, शहर, प्रभाग आणि बूथ पातळीवर नागरिकांशी थेट संवाद साधून पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांची माहिती द्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला बळ देण्यासाठी संघटनेने जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रा. सूर्यवंशी यांनी केले.
प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न — प्रा. रमेश बारसागडे
जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे म्हणाले की, ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हाभर विविध सेवाभावी व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे हा ‘सेवा ज्योती यात्रे’चा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. अशोक नेते, माजी आमदार तथा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री डॉ. प्रकाश गेडाम, गोविंद सारडा, सदानंद कुथे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा योगिता पिपरे, तालुकाध्यक्ष रेखा डोळस यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनामुळे ‘सेवा संकल्प अभियान’ाला नवी ऊर्जा मिळाली असून, यात्रेच्या माध्यमातून सेवा, जनसंपर्क आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला.








