Home Breaking News मार्कंडेश्वर देवस्थानात जलाभिषेक करून ‘सेवा संकल्प अभियान’चा शुभारंभ

मार्कंडेश्वर देवस्थानात जलाभिषेक करून ‘सेवा संकल्प अभियान’चा शुभारंभ

0
25
Oplus_131072

मार्कंडेश्वर देवस्थानात जलाभिषेक करून ‘सेवा संकल्प अभियान’चा शुभारंभ

विश्वगौरव पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदि यांच्या दीर्घायुष्यासाठी मार्कंडेश्वर चरणी पार्थना

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे व भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची प्रमुख उपस्थिती

गडचिरोली : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या नेतृत्वात तसेच भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्कंडादेव येथील ऐतिहासिक मार्कंडेश्वर देवस्थानात जलाभिषेक व विधिवत पूजा-अर्चा करून अभियानाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी भगवान मार्कंडेश्वर यांच्या चरणी जलाभिषेक करून पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभावी, अशी प्रार्थना करण्यात आली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

‘सेवा संकल्प अभियान’ दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक, सेवाभावी आणि जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून सेवा, जनसहभाग आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

अभियानांतर्गत ‘आशीर्वादाचा दिवा’, ‘स्वप्नांचा भारत’ चित्रकला व भाषण स्पर्धा, ‘नमो सेवा गाथा’ नाटक सादरीकरण, अंगणवाडी सेविका सन्मान, विकासकामांची रील स्पर्धा, सेवा दीप यात्रा, ‘सेवा व आपले योगदान’, सेवा सेतू अभियान, रांगोळी स्पर्धा, विकसित भारत संकल्प यात्रा, इनोव्हेशन चॅलेंज तसेच पवित्र जल संकलन यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या उपक्रमांमध्ये शेतकरी, मजूर, युवक, महिला, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सरपंच, अंगणवाडी सेविका तसेच समाजातील विविध घटकांना सहभागी करून व्यापक जनसहभागाला चालना देण्यात येणार आहे. विविध स्पर्धा, सेवाभावी उपक्रम आणि जनजागृतीपर कार्यक्रमांच्या माध्यमातून विकसित भारताची संकल्पना, सामाजिक सेवा आणि राष्ट्रनिर्मितीतील नागरिकांचे योगदान याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

मार्कंडेश्वर देवस्थानातील जलाभिषेकाने जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियानाचा’ प्रारंभ झाला असून आगामी महिनाभर जिल्ह्यातील विविध भागांत कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. अभियानातील सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाला भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा महामंत्री साईनाथ बुरांडे, रामचंद्र वरवाडे, जयराम चलाख, राजू मोगरे, भरत धोडरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!