
गणपूर केंद्राची दुसरी शिक्षण परिषद उत्साहात; शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रमांवर मंथन
निपुण महाराष्ट्र, पायाभूत साक्षरता, DIKSHA, AI व नवभारत साक्षरतेवर मार्गदर्शन; शिक्षकांनी केली अनुभवांची देवाणघेवाण
श्री. मनोज उराडे, गडचिरोली प्रतिनिधी
गडचिरोली: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली चक नं. १ येथे गणपूर केंद्राची दुसरी शिक्षण परिषद दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण आणि शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली. केंद्रप्रमुख श्री. कपिल सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परिषदेत शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन व विचारमंथन करण्यात आले.
शिक्षण परिषदेत निपुण महाराष्ट्र, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, अध्ययन निष्पत्तीवर आधारित पाठाचे नमुना सादरीकरण, यशोगाथा (Best Practices), शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केंद्रनिहाय कृती आराखडा आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यासोबतच शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेच्या तयारीचा आढावा घेऊन त्यातील अडचणी आणि समस्या निराकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर DIKSHA Courses आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यासंदर्भातही शिक्षकांना माहिती देण्यात आली. मूल्यवर्धन, सत्र परिणामासाठी कार्यान्वयन आणि नवभारत साक्षरता या विषयांचाही परिषदेत समावेश होता.
विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, मानसिक शांतता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यासाठी आनापान ध्यानाचे महत्त्व विशद करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबत मानसिक आणि भावनिक विकासालाही प्राधान्य देण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत मुधोलीचे उपसरपंच श्री. दिलीप वर्धलवार होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक शेडमाके, नामदेव वर्धलवार, संजय शेडमाके यांच्यासह केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती.
विशेष शिक्षक श्री. रवीभाऊ खेवले यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्यांच्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा तसेच त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांविषयी मार्गदर्शन केले.
परिषदेदरम्यान शिक्षकांनी विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण करत आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी विविध कल्पना व प्रयोगांवर चर्चा झाल्याने ही परिषद शिक्षकांसाठी प्रेरणादायी तसेच शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी दिशादर्शक ठरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुधोली शाळेचे मुख्याध्यापक श्री. देवराव वर्धलवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. संतोष नागरगोजे यांनी केले. केंद्रातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गणपूर केंद्राची दुसरी शिक्षण परिषद यशस्वीरीत्या संपन्न झाली.








