Home Breaking News पैशांअभावी शिक्षण थांबू नये; होतकरू विद्यार्थिनीच्या मदतीला धावला गानली समाज

पैशांअभावी शिक्षण थांबू नये; होतकरू विद्यार्थिनीच्या मदतीला धावला गानली समाज

0
8

पैशांअभावी शिक्षण थांबू नये; होतकरू विद्यार्थिनीच्या मदतीला धावला गानली समाज

 

शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात; ₹१२ हजारांची आर्थिक मदत; पुढील शिक्षणासाठीही सहकार्याची ग्वाही

 

गडचिरोली : आर्थिक परिस्थितीमुळे एका होतकरू विद्यार्थिनीच्या उच्च शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी अखिल भारतीय गानली समाज संघटना, जिल्हा शाखा गडचिरोली पुढे सरसावली आहे. नवेगाव मूरखळा येथील कु. नूतन अतुल संगीडवार हिला शिक्षणासाठी समाजबांधवांनी एकत्रितपणे ₹१२ हजारांची आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.

 

कु. नूतन अतुल संगीडवार हिची शासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोली येथे प्रवेशासाठी निवड झाली होती. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे प्रवेशासाठी आवश्यक रक्कम भरणे कठीण झाले होते. आर्थिक अडचणीमुळे शिक्षणाची संधी हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने तिने अखिल भारतीय गानली समाज संघटनेकडे मदतीसाठी अर्ज केला.

 

विद्यार्थिनीची परिस्थिती समजल्यानंतर संघटनेचे पदाधिकारी आणि समाजबांधवांनी तातडीने पुढाकार घेतला. सर्वांनी आपापल्या परीने आर्थिक योगदान देत ₹१२,०००/- इतकी मदत जमा केली. ही रक्कम विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिला प्रत्यक्ष सुपूर्द करण्यात आली.

 

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतनला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तिचा प्रथम वर्षाचा निकाल समाधानकारक राहिल्यास पुढील शिक्षणासाठीही शक्य ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही संघटनेच्या वतीने देण्यात आली.

 

या सामाजिक उपक्रमासाठी नितीन संगीडवार, स्नेहल संतोषवार, प्रवीण चन्नावार, विपुल चन्नावार, अतुल नागूलवार, कमलाकर वडेट्टीवार, शंकरराव कस्तुरवार, अशोक चन्नावार, नरेंद्र (बालू) चन्नावार, नंदू गुंडावार, जयंत बल्लमवार, निकेतन गधेवार, रवी चन्नावार, ममताताई कोतपल्लीवार, प्रशान्त पोरेड्डीवार, अशोक पोरेड्डीवार, प्रकाश तोडेवार, श्रीनिवास गोडशेलवार व सुरेखाताई राजेश चन्नावार यांनी आर्थिक सहकार्य केले.

 

मदत सुपूर्द करताना नितीन संगीडवार, स्नेहल संतोषवार, प्रकाश तोडेवार, प्रवीण चन्नावार, नंदू गुंडावार व राजेश चन्नावार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

शिक्षणासाठी समाजाने पुढे येणे काळाची गरज

 

“आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही होतकरू विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे हीच समाजाची खरी सामाजिक बांधिलकी आहे. समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच गरजेच्या वेळी शक्य ते सहकार्य करण्याचा संघटनेचा प्रयत्न यापुढेही सुरू राहील,” असा निर्धार अखिल भारतीय गानली समाज संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!