
घोट येथे सामूहिक शिक्षण परिषदेतून शैक्षणिक विचारमंथन
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसह विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीवर मार्गदर्शन
घोट : विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने शालेय शिक्षण विभाग, पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत घोट, मक्केपल्ली व रेगडी या तीन समूह साधन केंद्रांची सामूहिक पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नवोदय प्राथमिक शाळा, घोट येथे उत्साहात पार पडली.
या शिक्षण परिषदेला तिन्ही केंद्रांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करणारे प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक तसेच मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन नवोदय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विजयश्री कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घोट केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. अनिल मार्तीवार होते. प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून मक्केपल्लीचे केंद्रप्रमुख श्री. रोशन बागडे व रेगडीचे केंद्रप्रमुख श्री. धकाते उपस्थित होते.
शिक्षण परिषदेत कु. अर्चना सेमकर यांनी ‘शाळापूर्व तयारी’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. श्री. रोशन बागडे यांनी सेतू अभ्यासक्रमाची ओळख करून देत त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. श्री. बापू भोयर यांनी ‘निपुण महाराष्ट्र’ कार्यक्रमाचा आढावा घेत आवश्यक कार्यवाहीची माहिती दिली.
यानंतर श्री. बाच्छाड यांनी ‘जयंत नारळीकर गणित व विज्ञान समृद्धी कार्यक्रमाची’ माहिती देत शिक्षक नोंदणी, वर्ग नोंदणी व विद्यार्थी नोंदणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. श्री. भूमेश बुरमवार यांनी इको क्लब व विद्यांजली उपक्रमांवर सखोल मार्गदर्शन केले. श्री. मदन आभारे व अविनाश बारसागडे यांनी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा याबाबत मार्गदर्शन केले. कु. कोहपरे व श्री. जीवन शेट्टे यांनी प्रशस्त ॲपच्या नोंदणी प्रक्रियेची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन श्री. बापू भोयर यांनी केले, तर श्री. शेट्टे सर यांनी शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. परिषदेदरम्यान पूर्वचाचणी व उत्तरचाचणी घेण्यात आली.
घोट, मक्केपल्ली व रेगडी या तिन्ही केंद्रांची ही सामूहिक शिक्षण परिषद शिक्षकांना नवऊर्जा व नवप्रेरणा देणारी ठरली. विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आणि आगामी शैक्षणिक वाटचालीसाठी ही परिषद प्रेरणादायी ठरल्याचे उपस्थित शिक्षकांनी सांगितले.








