Home गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘संविधान हत्या दिवस’ कार्यक्रम संपन्न;...

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘संविधान हत्या दिवस’ कार्यक्रम संपन्न; प्रा. गजानन ढोले यांचे प्रभावी मार्गदर्शन: आणीबाणीच्या काळाचे स्मरण!

0
18

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘संविधान हत्या दिवस’ कार्यक्रम संपन्न; प्रा. गजानन ढोले यांचे प्रभावी मार्गदर्शन: आणीबाणीच्या काळाचे स्मरण!

आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील सर्वात मोठा काळा डाग; संविधानाची गळचेपी कधीही विसरता येणार नाही, संविधानाचे रक्षण हि प्रत्येक नागरिकाची जवाबदारी – प्रा. गजाननजी ढोले

२५ जून ‘संविधान हत्या दिवस’ निमित्त भाजपातर्फे कार्यक्रम; लोकशाही रक्षकांना अभिवादन, आणीबाणीतील संघर्षाचे स्मरण

दिं 25/06/2026

गडचिरोली भारतीय जनता पार्टी, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने २५ जून १९७५ रोजी देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या स्मरणार्थ ‘संविधान हत्या दिवस’ विविध कार्यक्रमांनी पाळण्यात आला. आमदार कार्यालय, कर्तव्य कक्ष क्र. १ येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. गजानन ढोले यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे होते.

प्रास्ताविक करताना प्रा. रमेशजी बारसागडे यांनी २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा ऐतिहासिक संदर्भ उपस्थितांसमोर मांडला. आणीबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी आणि काळा अध्याय असून त्या काळात संविधानिक संस्थांवर, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर निर्बंध लादण्यात आले. या घटनांची माहिती आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक असून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा ठेवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तसेच कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करत संविधान हत्या दिवस साजरा करण्यामागील भूमिका त्यांनी उपस्थितांसमोर मांडली.

प्रारंभी भारतमाता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर आणि लोकशाही रक्षकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या संरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या लोकशाही सेनानींना श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रमुख वक्ते प्रा. गजानन ढोले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, २५ जून १९७५ हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी आणि काळा दिवस म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणीबाणी लागू करण्यात आली. या निर्णयामुळे संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले अनेक मूलभूत अधिकार प्रत्यक्षात मर्यादित झाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि विरोधी पक्षांच्या लोकशाही हक्कांवर निर्बंध आले.

ते पुढे म्हणाले की, आणीबाणीच्या काळात सरकारच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या लाखो राजकीय कार्यकर्ते, समाजसेवक, पत्रकार, विद्यार्थी, स्वयंसेवक आणि सामाजिक नेत्यांना अटक करून देशभरातील विविध कारागृहांमध्ये डांबण्यात आले. हजारो कुटुंबांना अन्याय सहन करावा लागला. प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप लादण्यात आली. वृत्तपत्रांना सरकारी परवानगीशिवाय बातम्या प्रकाशित करता येत नव्हत्या. त्यामुळे देशातील लोकशाही व्यवस्थेवर अभूतपूर्व संकट निर्माण झाले.

प्रा. गजानन ढोले यांनी सांगितले की, आणीबाणीच्या काळात सक्तीच्या कुटुंब नियोजन मोहिमेमुळे लाखो नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अनेक स्वयंसेवकांनी, लोकशाहीवादी कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रभक्तांनी तुरुंगवास भोगला. अनेकांनी आपल्या आयुष्याची वर्षे लोकशाहीच्या रक्षणासाठी समर्पित केली. हा संघर्ष केवळ एखाद्या पक्षाचा नव्हता, तर भारतीय संविधान, लोकशाही आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा होता.

भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे. संविधानाचे रक्षण करणे, लोकशाही मूल्ये जपणे आणि नागरिकांच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करणे हे प्रत्येक भारतीयाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.

ते पुढे म्हणाले की, आजची युवा पिढी लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारी आणि संविधानाच्या तत्त्वांवर विश्वास ठेवणारी असावी. स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या संविधानिक मूल्यांचे संरक्षण करणे हीच लोकशाही सेनानींना खरी आदरांजली ठरेल.

कार्यक्रमाला माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर, शहराध्यक्ष तथा नगर परिषद बांधकाम सभापती अनिल कुनघाळकर, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, तालुका अध्यक्ष दत्तू सूत्रपवार, जिल्हा व तालुका पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ कार्यकर्ते व भारतीय जनता पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या लोकशाही सेनानींना सामूहिक अभिवादन करण्यात आले. तसेच संविधानाचा सन्मान राखण्याचा, लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याचा आणि देशाच्या लोकशाही परंपरेला अधिक बळकट करण्याचा सामूहिक संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. उपस्थितांनी “लोकशाही अमर राहो”, “भारतमाता की जय” आणि “वंदे मातरम्” घोषणा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!