
बालकांचे आरोग्य हिच राष्ट्राची खरी संपत्ती; पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला गडचिरोलीत उत्साहात शुभारंभ; आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उद्घाटन
“दोन थेंब प्रत्येक वेळी – पोलिओमुक्त भविष्यासाठी”चा दिला जनजागृतीचा संदेश
गडचिरोली :देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या राष्ट्रीय संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार डॉ. मिलिंद नरोटे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे ‘दोन थेंब’ पाजून मोहिमेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, बालकांचे निरोगी आरोग्य हे देशाच्या उज्ज्वल भविष्याचा मजबूत पाया आहे. पोलिओसारख्या गंभीर आजाराचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून प्रत्येक पालकाने या मोहिमेला आपली सामाजिक जबाबदारी समजून सहकार्य करणे आवश्यक आहे. पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, “दोन थेंब प्रत्येक वेळी” हा केवळ घोषवाक्य नसून प्रत्येक बालकाच्या सुरक्षित आणि निरोगी आयुष्याची हमी आहे. भारताने पोलिओ निर्मूलनात मोठे यश मिळविले असले तरी हे यश कायम टिकविण्यासाठी प्रत्येक राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत पालकांनी आपल्या बालकांना आवर्जून लसीचे दोन थेंब पाजणे अत्यावश्यक आहे.
यावेळी नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, नगर परिषद महिला व बालकल्याण सभापती सीमा कन्नमवार, नगरसेविका वर्षा शेडमाके, ज्ञानेश्वरी धंदरे, शिल्पा हेमके, अर्चना निंबोड, साक्षी बोलूवार, भाजपचे अविनाश विश्रोजवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने मोहिमेचे उद्दिष्ट, लसीकरणाचे महत्त्व आणि पोलिओ प्रतिबंधासाठी आवश्यक खबरदारी याविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्येक पालकाने आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला लसीचे दोन थेंब आवर्जून पाजावेत, असे आवाहन करण्यात आले.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर तसेच दुर्गम भागात विशेष पथकांमार्फत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
कार्यक्रमात “दोन थेंब प्रत्येक वेळी – पोलिओमुक्त भविष्यासाठी!” हा संदेश देत व्यापक जनजागृती करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनीही नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ही केवळ शासकीय उपक्रम नसून प्रत्येक कुटुंब, प्रत्येक पालक आणि संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. निरोगी बालपण, सुदृढ समाज आणि पोलिओमुक्त भारत या ध्येयपूर्तीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा महिला व बाल रुग्णालय तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला








