Home गडचिरोली गोंडवाना विद्यापीठातील प्रशासकीय सुस्तीवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे आक्रमक; रखडलेल्या प्रकल्पांवर प्रशासनाला...

गोंडवाना विद्यापीठातील प्रशासकीय सुस्तीवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे आक्रमक; रखडलेल्या प्रकल्पांवर प्रशासनाला धारेवर

0
22

गोंडवाना विद्यापीठातील प्रशासकीय सुस्तीवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे आक्रमक; रखडलेल्या प्रकल्पांवर प्रशासनाला धारेवर

 

दि.12/05/2026

 

गडचिरोली:जिल्ह्याच्या शैक्षणिक भवितव्याशी थेट संबंधित असलेल्या गोंडवाना विद्यापीठ मधील प्रशासकीय दिरंगाई, रखडलेले विकास प्रकल्प आणि खालावलेला शैक्षणिक दर्जा याविरोधात आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आज आक्रमक भूमिका घेत विद्यापीठ प्रशासनाला थेट जाब विचारला. विद्यापीठाच्या नवीन प्रस्तावित कॅम्पसचे बांधकाम निधी उपलब्ध असूनही का रखडले आहे, तसेच महत्त्वाचे शैक्षणिक प्रस्ताव अजूनही प्रलंबित का आहेत, याबाबत त्यांनी प्रा. कुलगुरू श्रीरामजी कावळे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

“जिल्ह्यातील आदिवासी आणि गरजू विद्यार्थ्यांच्या हक्काचा पैसा आणि वेळ वाया जाऊ देणार नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारे प्रशासन कदापि खपवून घेतले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा यावेळी आमदार डॉ. नरोटे यांनी दिला.

 

यावेळी त्यांनी केंद्र शासनाच्या PM-USHA योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरत असल्याचा गंभीर आरोप करत, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा आणि नियोजनाचा अभाव अधोरेखित केला. “हे विद्यापीठ केवळ इव्हेंटबाजीचे केंद्र नसून शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि शिस्त यांचे आदर्श केंद्र असले पाहिजे,” असे ठणकावत त्यांनी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली.

 

यानंतर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विद्यापीठ कॅम्पसची प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. विविध विभागांच्या प्रयोगशाळांची अवस्था अत्यंत दयनीय असून आवश्यक साहित्याची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याचे स्पष्ट झाले. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या अभावामुळे प्रयोगशाळा निष्क्रिय होण्याच्या मार्गावर असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

 

“साहित्यच नसताना विद्यार्थी प्रयोग तरी कसे करणार?” असा संतप्त सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली. कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या घोषणा आणि मोठमोठ्या विकासाच्या दाव्यांमागे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या पदरी केवळ निराशाच पडत असल्याचे वास्तव त्यांनी मांडले.

 

विद्यार्थ्यांची नोंदणी सातत्याने घटत असताना प्रशासन आत्मपरीक्षण करण्याऐवजी तांत्रिक कारणे पुढे करून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करत, “यापुढे कागदी घोडे न नाचवता तातडीने सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ठोस पावले उचलावीत. अन्यथा विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आम्हाला अधिक आक्रमक भूमिका घ्यावी लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

 

यावेळी भाजपा प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खट्टी, कुलसचिव हिरेकन, सिनेट सदस्य सतीश चिचघरे, रुपेंद्र गौर, स्वरूप तारगे तसेच अरुण प्रकाश उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!