
गडचिरोलीत बेमुदत ठिय्या आंदोलनाची सुरुवात – दुसऱ्या दिवशीही प्रशासनाविरोधात संताप कायम
गडचिरोली, दि. १३ फेब्रुवारी २०26
गडचिरोली: साखेरा येथील कथित अवैध रेती उत्खनन, शासकीय रेती घाटातील गैरव्यवहार आणि महसूल यंत्रणेच्या भूमिकेविरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. दि. १२ फेब्रुवारी २०१५ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली समोर आंदोलन सुरू करण्यात आले असून ग्रामस्थ मोठ्या संख्येने ठिय्या देऊन बसले आहेत.
साखरा येथील शासकीय रेती घाट तसेच मोटवानी यांच्या शेती रेती घाटाबाबत गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शेती घाटातील रेती ही विक्रीयोग्य नसताना संबंधित घाटधारकांकडून शासकीय रेती घाटातीलच रेतीची विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासन महसुलाचे मोठे नुकसान होत असून स्थानिक महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलन कर्ते सौ अर्चना बोरकुटे उपसरपंच ग्रामपंचायत साखरा सौ नीता साखरे माजी सदस्य जिल्हा परिषद गडचिरोली श्री प्रभाकर मेश्राम यांनी केला आहे आहे.
आंदोलन कर्त्यांच्या म्हणण्यानुसार, शेती रेती घाटाला दिलेली परवानगी ही विशिष्ट अटी व नियमांवर आधारित असते. मात्र प्रत्यक्षात त्या अटींचे उल्लंघन करून शासकीय घाटातील रेतीचा वापर व विक्री केली जात असल्याने हा प्रकार गंभीर आर्थिक व कायदेशीर गुन्हा ठरतो. यामुळे शासनाच्या तिजोरीला फटका बसत असून स्थानिक पातळीवर भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये साखरा शासकीय रेती घाट व शेती रेती घाटाची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, अवैध उत्खनन तात्काळ बंद करावे, तसेच संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. शेती घाटास २०१९ पासून कोणत्या नियमांनुसार परवानगी देण्यात आली, त्या परवानगी आदेशांची प्रत सार्वजनिक करावी व नियमबाह्य परवानग्या रद्द कराव्यात, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.
याशिवाय, गडचिरोली तालुक्यातील कनेरी, कोडगल व पारडी येथील वाळूघाटांवर झालेल्या कथित अवैध उत्खनन व साठवणुकीचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः पारडी वाळूघाटावरून अवैध वाळू वाहतूक करताना पोलिसांनी पकडलेल्या प्रकरणात शासनाची झालेली आर्थिक हानी संबंधितांकडून वसूल करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन शक्य नाही. त्यामुळे केवळ घाटधारकांवर कारवाई न करता संबंधित अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासून त्यांच्यावर विभागीय चौकशी व निलंबनाची कारवाई करावी.
या आंदोलनात साखरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. अर्चना दिनेश बोरकुटे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. निताताई साखरे, श्री. प्रभाकर मेश्राम यांच्यासह ग्रामस्थ सक्रिय सहभाग घेत आहेत. महिलांचीही लक्षणीय उपस्थिती आंदोलनस्थळी दिसून येत आहे.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जोपर्यंत शासन स्तरावर ठोस आणि लेखी निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत हे बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेतले जाणार नाही.”
सध्या आंदोलन शांततेत सुरू असले तरी परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी व योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.








