Home गडचिरोली दुर्गम गडचिरोलीत बालरूग्णांसाठी दिलासा;जिल्ह्यातील ३४ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया 

दुर्गम गडचिरोलीत बालरूग्णांसाठी दिलासा;जिल्ह्यातील ३४ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया 

0
15

दुर्गम गडचिरोलीत बालरूग्णांसाठी दिलासा;जिल्ह्यातील ३४ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

 

गडचिरोली, (जिमाका) दि. ०९ :

जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) मार्फत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक व विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीदरम्यान जन्मजात आजार असलेली बालके शोधून त्यांच्यावर पुढील उपचार, विशेष चाचण्या, निदान निश्चिती, तज्ञ सल्ला व शस्त्रक्रिया आदी सेवा पुरविण्यात येतात.

 

या अनुषंगाने “द्वितीयस्तरीय संदर्भसेवा कक्ष” म्हणून कार्यरत असलेल्या डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरवेन्शन सेंटर (DEIC), जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे गरजेनुसार द्वितीय व तृतीय स्तरावरील आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, बाह्य संपर्क अधिकारी डॉ. बागराज धुर्वे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके (जिल्हा महिला व बाल रुग्णालय) यांच्या नियोजनात, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०७ व ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे बालकांमधील जन्मजात आजारांवर शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

या शस्त्रक्रिया शिबिरासाठी नागपूर येथील इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जन्स या संस्थेच्या चमूतील नामवंत तज्ञ उपस्थित होते. यामध्ये डॉ. मनीषा अलबल (वरिष्ठ बाल शल्य चिकित्सक), डॉ. मानसी अंभारे (वरिष्ठ बाल भूलतज्ञ) तसेच इतर तज्ञ शल्य चिकित्सकांचा समावेश होता. या चमूसोबत डॉ. माधुरी किलनाके यांनीही शस्त्रक्रिया पार पाडल्या.

 

या दोन दिवसीय शिबिरामध्ये हर्निया, हायड्रोसील, फायमोसीस व इतर जन्मजात आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पहिल्या दिवशी १८ तर दुसऱ्या दिवशी १६ अशा एकूण ३४ बालकांच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या.

 

या उपक्रमात सामान्य रुग्णालयातील डॉ. नागसेन साखरे (भूलतज्ञ), डॉ. कृणाल चेंडकापुरे (शल्य चिकित्सक), डॉ. मित्तल गेडाम, डॉ. समीर बनसोडे (भूलतज्ञ), श्रीमती नांदगाये सिस्टर (ओटी इन्चार्ज) तसेच ऑपरेशन थिएटर चमूचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात आरोग्य सेवा पुरविताना अनेक अडचणी येतात. मात्र अशा शस्त्रक्रिया शिबिरांमुळे पालकांना आपल्या बालकांसाठी तज्ञ वैद्यकीय सेवा जिल्ह्यातच उपलब्ध होत असून पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

“जितके लवकर निदान, तितका लवकर उपचार” या तत्त्वानुसार, आरबीएसके–डीईआयसी कार्यक्रमामुळे बालकांमधील जन्मजात आजारांचे वेळेत निदान, समुपदेशन व योग्य उपचार शक्य होत आहेत. तरी पालकांनी आपल्या बालकांमध्ये जन्मजात आजाराची शंका असल्यास राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK), जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली अथवा जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC), जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!