
रेगडी-हळदवाहीच्या १४ गावातील नागरिकांना सिंचनाची सोय व्हावी याकरीता राज्य शासनाकडे साकडे घालनार_ डॉ. प्रणय खुणे
राज्यपाल व मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी १४ गावांतील नागरिकांची तयारी; कायमस्वरूपी सिंचन प्रकल्पाची मागणी
दि. १२ ऑगस्ट २०२६
गडचिरोली _ घोट: रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील १४ गावांतील नागरिक व शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रश्नाची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
या भागातील दीना प्रकल्पाच्या माध्यमातून चामोर्शी परिसरातील मोठ्या क्षेत्रातील शेतीला सिंचनाची सुविधा मिळत आहे. मात्र, ज्या परिसरातून या सिंचन व्यवस्थेसाठी पाण्याची उपलब्धता होते, त्याच रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील शेकडो हेक्टर शेती अद्याप सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, या प्रश्नाला निर्णायक दिशा देण्यासाठी डॉ. प्रणय भाऊ खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ गावांतील नागरिक व शेतकऱ्यांची एकजूट करून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची मुंबई येथे भेट घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या भेटीदरम्यान रेगडी-हळदवाही परिसरासाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी सिंचन प्रकल्प मंजूर करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
“१४ गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईपर्यंत आपण शांत बसणार नाही. स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करू. आवश्यकता भासल्यास हजारो शेतकऱ्यांचे विराट जनआंदोलन उभारण्यात येईल, तसेच आमरण उपोषण, चक्काजाम आणि इतर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी दिला.
या मागणीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोलीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच १४ गावांतील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलनात्मक भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
इमेज मध्ये बातमी तयार करून द्या








