
लाखोंचा निधी गेला कुठे? जलकुंभ आणि घंटागाडी पडल्या निष्क्रिय; ग्रामस्थांचा संताप अनावर!
गडचिरोली:सिरोंचा शासनाच्या विविध विकास योजनांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या योजना आज निष्प्रभ ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जलपुरवठा सुरळीत करण्यासाठी उभारण्यात आलेला जलकुंभ आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी खरेदी करण्यात आलेली घंटागाडी आज वापराअभावी धूळ खात पडली असून नागरिकांना त्याचा कोणताही लाभ मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील नागरिकांच्या पाण्याच्या समस्येचे निराकरण व्हावे, या उद्देशाने लाखो रुपयांचा खर्च करून जलकुंभ उभारण्यात आला. परंतु प्रत्यक्षात हा जलकुंभ नागरिकांसाठी उपयोगी ठरण्याऐवजी केवळ एक उंच इमारत बनून राहिला आहे. शासनाचा निधी खर्च झाला, कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले; मात्र नागरिकांच्या नळांमध्ये पाणी पोहोचलेच नाही, अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. याचप्रमाणे गावातील स्वच्छता व्यवस्था सुधारण्यासाठी आणि घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नुकतीच नवीन घंटागाडी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध करून देण्यात आली. परंतु ही घंटागाडी गावातील कचरा संकलनासाठी वापरण्याऐवजी एका कोपऱ्यात निष्क्रिय अवस्थेत उभी असल्याचे दिसून येत आहे. ज्या वाहनासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला, ते वाहन नागरिकांच्या सेवेसाठी रस्त्यावर दिसण्याऐवजी शोभेची वस्तू बनून राहिले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
विशेष म्हणजे, एकीकडे गावात पाणीटंचाई, स्वच्छतेचा अभाव, रस्त्यांची दुरवस्था आणि इतर मूलभूत समस्यांनी नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे लाखो रुपयांच्या विकासकामांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे “निधी खर्च झाला, पण सुविधा कुठे गेल्या?” असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, जलकुंभ व घंटागाडी कार्यान्वित न होण्यामागील कारणे सार्वजनिक करावीत, खर्च झालेल्या निधीचा तपशील जाहीर करावा आणि संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जनतेच्या करातून उभारलेला निधी जर जनतेलाच उपयोगी पडत नसेल, तर अशा विकासकामांचा नेमका फायदा कोणाला? हा प्रश्न आज जाफ्राबादच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झाला असून, आता ग्रामस्थांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून निष्क्रिय पडलेल्या जलकुंभ व घंटागाडी सुरू कराव्यात आणि निधीच्या गैरवापराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.








