
गडचिरोली नगर परिषदेत काम बंद आंदोलन; अहेरीतील अधिकारीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचा तीव्र संताप
दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गडचिरोली :अहेरी नगर पंचायत येथील कर व प्रशासकीय सेवा अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर कर्तव्य बजावत असताना झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ गडचिरोली नगर परिषदेत आज कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काम बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनाद्वारे संबंधित घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला असून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
नगर परिषद परिसरात अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, शासकीय अधिकारी व कर्मचारी हे सार्वजनिक सेवेसाठी कार्यरत असताना त्यांच्यावर होणारे हल्ले ही अत्यंत गंभीर बाब असून अशा घटनांमुळे प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत आहे.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लोकांच्या सेवेसाठी निःपक्षपातीपणे काम करणे अपेक्षित असते. मात्र कर्तव्य बजावताना जर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर भविष्यात प्रशासनाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा घटनांमध्ये दोषींना तातडीने अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, संबंधित प्रकरणात तातडीने निर्णय घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यात यावी. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
गडचिरोली नगर परिषद परिसरात झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांनी एकमुखाने “कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत” असा संदेश देत प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली.








