
कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीसाठी ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्याविरोधात विविध आरोपांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच त्यांना सेवेतून निलंबित करून जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, या मागण्यांसाठी मंगळवार, ९ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिली आहे.
या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अरविंदभाऊ कात्रटवार मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
कात्रटवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या कार्यपद्धतीबाबत विविध तक्रारी व आरोप यापूर्वीही मांडण्यात आले असून त्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी २५ मे २०२६ रोजी अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन तसेच ३ जून २०२६ रोजी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर प्रतिकात्मक प्रेतयात्रा आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
काञटवार यांनी केलेल्या आरोपानुसार , कोरची तालुक्यातील नाडेकल–बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवरील अंदाजे ५ कोटी रुपयांच्या पुलाच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून पुल वाहतुकीस सुरू होण्यापूर्वीच कोसळल्याने संबंधित कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी. दोषींवर कारवाई करून शासकीय निधीची वसुली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच २०२५–२६ आर्थिक वर्षातील ग्रामीण भागातील रस्ते व पुल दुरुस्ती कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून काही कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी न करता देयके काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय, कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी वर्तनाबाबतही गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिला आहे.
टीप: वरिल आरोप हे आंदोलनकत्यानी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार असून संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका उपलब्ध होऊ शकली नाही








