Home गडचिरोली गडचिरोलीत कोट्यवधींच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह : वैनगंगा नदीवरील नव्या पुलात दीड वर्षातच मोठा...

गडचिरोलीत कोट्यवधींच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह : वैनगंगा नदीवरील नव्या पुलात दीड वर्षातच मोठा खड्डा, भ्रष्टाचाराच्या संशयाला बळ

0
29

गडचिरोलीत कोट्यवधींच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह : वैनगंगा नदीवरील नव्या पुलात दीड वर्षातच मोठा खड्डा, भ्रष्टाचाराच्या संशयाला बळ

 

गडचिरोली (प्रतिनिधी) :

जिल्ह्यात विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येत असताना प्रत्यक्षात कामांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 बी अंतर्गत गडचिरोली–चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या आष्टीजवळील वैनगंगा नदीवरील नव्या पुलाच्या गुणवत्तेबाबत मोठी शंका निर्माण झाली आहे.

 

सुमारे 210 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा पूल अवघ्या दीड वर्षांपूर्वी पूर्ण झाला होता. मात्र इतक्या अल्पावधीतच पुलाच्या मध्यभागी मोठा खड्डा पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.

 

दरम्यान, पहाटेच्या सुमारास हा खड्डा चालकांच्या नजरेस न पडल्याने दोन ट्रकांची जोरदार धडक झाली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी अशा प्रकारामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आणि संबंधित कंत्राटदारांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळे येथे पारदर्शक व कार्यक्षम प्रशासनाची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र सध्याची परिस्थिती पाहता, काही अधिकारी व कंत्राटदारांच्या संभाव्य संगनमतामुळे गडचिरोली जिल्हा “भ्रष्टाचाराचा हॉटस्पॉट” बनत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

 

या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार, पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित पुलाच्या कामाची तातडीने उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, दोषी आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, त्यांचे परवाने (लायसन्स) रद्द करून त्यांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) समाविष्ट करावे, तसेच आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

समितीने इशारा दिला आहे की, शासनाने या गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्ष न दिल्यास व्यापक लोकआंदोलन छेडण्यात येईल. नागरिकांच्या जीविताशी संबंधित असलेल्या या अत्यंत संवेदनशील प्रश्नावर प्रशासनाने त्वरीत आणि ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

 

राज्य अध्यक्ष श्री. महेश सारणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष श्री. मनोज उराडे यांच्या नेतृत्वात जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व सभासदांनी या कथित निष्कृष्ट कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!