
वैनगंगा नदीच्या पुलाखाली रामनगर येथिल ३४ वर्षीय महिलेचा मृतदेह; गडचिरोलीत खळबळ
गडचिरोली :
गडचिरोली शहरातील रामनगर परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेचा मृतदेह वैनगंगा नदीच्या पुलाखाली पाण्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. प्राथमिक तपासणीमध्ये सदर महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मृत महिलेचे नाव कांता अनिल मोहूरले (वय ३४) असे असून ती गडचिरोली शहरातील रामनगर परिसरातील रहिवासी होती. तिचा मृतदेह गडचिरोली शहरापासून सुमारे ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलाखाली पाण्यात तरंगताना आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कांता मोहूरले ही रामनगर परिसरात अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्यावर यापूर्वीही काही गुन्हे नोंद असल्याचे सांगितले जात आहे. घटनेपूर्वी ती आपल्या काही महिला सहकाऱ्यांसोबत गडचिरोली शहराच्या पलीकडे वैनगंगा नदी ओलांडून चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत असलेल्या एका ठिकाणी पार्टीसाठी गेल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हा प्रकार आत्महत्येचा आहे की त्यामागे कोणता घातपात आहे, याचा तपास पोलिसांकडून विविध अंगांनी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. पोस्टमॉर्टेम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत असलेल्या काही ठिकाणी अवैध दारू विक्री आणि नशेखोरीचे अड्डे सुरू असल्याचे गंभीर चित्र या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. अशा ठिकाणांमुळे परिसरात नशाखोरी वाढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
या घटनेनंतर सीमावर्ती भागातील अवैध दारू विक्री आणि नशेखोरीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत असून पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.








