
जागतिक महिला दिनानिमित्त सेमाना देवस्थान येथे ‘ग्रीन वारियर’ व ‘युवा क्लब’च्या पुढाकाराने स्वच्छता अभियान
भाविकांच्या श्रद्धास्थानाला दिले स्वच्छतेचे नवे रूप;युवक- युवतींच्या सहभागातून परिसर चकाचक
गडचिरोली:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गडचिरोली–चामोर्शी मार्गावरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सेमाना देवस्थान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रीन वारियर व युवा क्लब यांच्या संयुक्त पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या अभियानात सहभागी युवक-युवतींनी परिसरातील कचरा गोळा करून देवस्थान परिसर स्वच्छ व सुंदर केला.
सेमाना देवस्थान हे जिल्ह्यातील महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ मानले जाते. येथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे परिसरात निर्माण होणारी अस्वच्छता लक्षात घेऊन युवकांनी पुढाकार घेत स्वच्छता अभियान राबविले. या उपक्रमामुळे देवस्थान परिसर स्वच्छ व आकर्षक बनला.
या मोहिमेत सहभागी झालेल्या स्वच्छतामित्रांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी नगर परिषद पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत बोरकुटे, डॉ. दीप बोदले, शिवणीचे सरपंच किरण ताटपल्लीवार, प्रा. राजेश कात्रटवार, प्रा. दिनेश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर धकाते तसेच सामाजिक कार्यकर्ते कृष्णाजी शेंडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वच्छतामित्रांचा उत्साह वाढवला व त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
या स्वच्छता अभियानात हर्षवर्धन मडावी, सुधीर मुनघाटे, मोहित समर्थ, मनोज उईके, मंथन लोळे, महेश धारणे, कुणाल गावतुरे, आदित्य कुद्रपावर, वैभव गेडाम, गौरव सेलोटे, आशिष दुर्गे, प्रणय सोनुले, वृषभ कुळमेथे, रामकृष्ण कडते आदी स्वच्छतामित्रांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच महिला दिनाचे प्रतीक म्हणून संध्या मडावी, सपना हिचामी व ममता लेनगुरे यांनीही उत्साहाने या अभियानात सहभाग घेतला.
या उपक्रमातून “स्वच्छ गडचिरोली, सुंदर गडचिरोली” असा संदेश देण्यात आला असून भाविकांनी देखील देवस्थान परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन ग्रीन वारियरच्या वतीने करण्यात आले.
लिलाधर भरडकर (सभापती, पाणी पुरवठा, नगर परिषद) म्हणाले, “केवळ शासन किंवा प्रशासनावर विसंबून न राहता तरुणांनी स्वच्छतेसाठी स्वतःहून पुढे येणे ही काळाची गरज आहे. ग्रीन वारियर आणि युवा क्लबने महिला दिनाचे औचित्य साधून दिलेला हा संदेश निश्चितच कौतुकास्पद आहे.”
हेमंत बोरकुटे (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती) म्हणाले, “धार्मिक स्थळे ही आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत. ती स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या युवकांच्या उपक्रमामुळे सेमाना परिसराला नवे रूप मिळाले आहे.”
तर डॉ. दीप बोदले यांनी सांगितले, “पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता ही आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. ‘स्वच्छ गडचिरोली, सुंदर गडचिरोली’ हे स्वप्न अशा उपक्रमांतूनच साकार होईल.”








