
कोटगल येथे साथ फाउंडेशन व सार्वजनिक वाचनालयातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
प्रतिमा पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
गडचिरोली: कोटगल येथील साथ फाउंडेशन कोटगल आणि सार्वजनिक वाचनालय कोटगल यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. शिवरायांनी दिलेला स्वराज्य, स्वाभिमान आणि न्यायाचा संदेश आजच्या समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले.
शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सौ. ममताताई दुधबावरे (सरपंच, ग्रामपंचायत कोटगल), मोहन ठाकरे (अध्यक्ष, तंटामुक्त समिती कोटगल), सुमित बुरांडे (अभाविप गडचिरोली), तसेच जयेश ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय साथ फाउंडेशन संस्थेचे सचिव चेतन कोलते, सार्वजनिक वाचनालयचे हरीश कोलते, प्रणय मेश्राम, साहिल मेश्राम तसेच इतर सदस्य आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, आजच्या तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे अत्यंत गरजेचे आहे. शिवरायांनी दाखविलेल्या धैर्य, प्रामाणिकपणा आणि जनकल्याणाच्या मार्गावर चालणे हीच खरी त्यांना अभिवादन ठरेल, असेही यावेळी सांगण्यात आले.
अत्यंत साध्या पण प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात परिसरातील शिवप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “जय भवानी, जय शिवाजी” आणि शिवगर्जनेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.








